सिल्लोड पंचायत समिती कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय योग  दिनानिमित्त आज सकाळी ०६:३० वा. सिल्लोड पंचायत समितीच्या आवारात योग सत्राचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. छत्रपती संभाजीनगर मिन्नू पी. एम. व गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व गटशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. 

६:३० ते ७:३० या वेळेत पार पडलेल्या सत्रात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांतील ८० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. योग प्रशिक्षक समाधान पंडित व काळंम पाटील यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, प्राणायाम व ध्यानधारणेचे प्रात्यक्षिकांसह महत्त्व समजावून सांगितले. उपस्थितांनी एकत्रितपणे योगासने करत निरोगी शरीरात निरोगी मन हा संदेश दिला. 

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरल्या छत्रपती संभाजीनगर जि.प.च्या आरोग्य व शिक्षण सभापती अनिता ज्ञानेश्वर मोठे. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांसोबत योगासने केली व दैनंदिन जीवनात नियमित योग करण्याचे आवाहन केले. 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नासेर खान पठाण यांनी योग दिनाचा इतिहास व आधुनिक जीवनातील महत्त्व विषद केले. योग केवळ आजार टाळत नाही, तर आजारांची मूळ प्रक्रिया उलटवून उपचारांमध्येही मदत करतो, असे ते म्हणाले. विस्तार अधिकारी शिक्षण रमेश ठाकूर यांनी योग शब्द युज या संस्कृत धातूपासून आल्याचे सांगितले.

ज्याचा अर्थ शरीर, मन व आत्मा यांचे एकत्रीकरण होय. या सत्रात ज्ञानेश्वर मोठे, सुनील मिरकर, बालविकास प्रकल्प अधिकारी सुनिता सनान्से, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रंजना कांबळे, विस्तार अधिकारी आरोग्य समाधान जाधव, तालुका अभियान व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान तुषार बर्गत, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अरुण घोलप, दादासाहेब काळे शाखा अभियंता बांधकाम यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. तालुका आरोग्य व गटशिक्षण कार्यालयाच्या समन्वयातून कार्यक्रम यशस्वी झाला. रमेश ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.