छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नशेच्या गोळ्या, सिरप विक्री करण्यासाठी घाटीत आलेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून तब्बल १० लाखांच्या नशेच्या गोळ्या, सिरप जप्त करण्यात आले. ही कारवाई २३ मार्चच्या मध्यरात्री एकदरम्यान घाटीत करण्यात आली. तौफिक रशीद अली (रा. काश्मिर मोहल्ला, चांदमारी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांनी दिली. आरोपीविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ मार्चच्या रात्री एक संशयित दुचाकीवर नशेसाठी वापर केल्या जाणार्या गोळ्या, सिरपची विक्री करण्यासाठी घाटीत येणार असल्याची माहिती निरीक्षक बागवडे यांना मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचला. दरम्यान, रात्री साडेदहादरम्यान संशयित एमएच २० डीबी १३०५ या दुचाकीने घाटीच्या प्रवेशद्वारावरून काही अंतर आतमध्ये आला. त्याचवेळी निरीक्षक बागवडे यांनी त्याला अडविले. पथकातील एपीआय दीपाली पाटील यांनी तौफिकची झडती घेतली असता त्याच्या खिशात केवळ मोबाइल आढळला. त्यानंतर तौफिकच्या स्कुटीची डिक्की तपासली असता त्यात २४०० गोळ्या, तसेच सिरपच्या १४ बॉटल्स आढळून आल्या. त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
एक गोळीचा भाव ४०० रुपये
एक नशेची गोळी चारशे रुपयांना यानुसार तब्बल नऊ लाख ६० हजार रुपयांच्या गोळ्या आणि ४० हजार रुपयांचे सिरप, मोबाइल, दुचाकी असा एकूण दहा लाख १६ हजार ४७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपाधिक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बागवडे यांच्यासह एपीआय दीपाली पाटील, कैलास गाडेकर, अतुल तुपे, रवींद्र साळवे, नितीन जाधव, हरिष मुंढे, राहुल काळे, ज्योती कीर्तीकर, आम्रपाली सूर्यवंशी यांच्या पथकाने केली. अधिक तपास पीएसआय विजय जगदाळे करत आहेत.










