उलटा चष्मा: बात हजम नही हुई सुभाषबाबू !

Foto

शहरवासीयांना जणू काही कळतच नाही, अशा अविर्भावात लोकसभेचे उमेदवार प्रचार करीत आहेत. मतदार म्हणजे अडाणी, अज्ञानी असतो असा यांचा ठाम समज! गाव, नगर, शहर जिथे तिथे आपल्या प्रगाढ बुद्धीचे ज्ञानामृत मतदारांना पाजण्याची चढाओढ करणार्‍या या मंडळींची कीव येतेय.  या उमेदवारांनी जगण्या मरण्याच्या प्रश्नांच्याच टाळूवरचे लोणी खाणे सुरू केले आहे.  त्यामुळे संताप अनावर होतोय, शहराची वाट लावणारांनी आणि शहराला विकासाची वाट दाखविण्याचे आश्वासन देणारांनी  जनतेला येड्यात काढू नये. ज्या शिवसेनेच्या नावावर ही मंडळी कचरा, रस्ते, पाणी प्रश्नाच्या पावत्या फाडत आहे. त्या विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी एक बाब लक्षात घ्यावी, निवडणुका दर पाच वर्षांनी येणारच आहेत ! जरा जपून बोला...काँग्रेसचे उमेदवार सुभाष बाबूंनी चौकाचौकात सिनेफ्लेक्स लावून शहरातील प्रश्नावर मर्मभेदी प्रहार केलाय. 

शहर दुर्गंधीयुक्त, खड्ड्यांचे पाण्यासाठी वणवण भटकणारे हवे का ? असा प्रश्न विचारला. त्या  सुभाषबाबूंनी, हर्षवर्धन जाधव अथवा इम्तियाज जलील यांनी खासदारकीसाठी मिळणारा पै न् पै जरी शहरासाठी खर्च केला तरीही शहरातील रस्ते, पाणी, कचरा हे प्रश्न सुटू शकणार नाहीत. बरे हे प्रश्न मिटविण्याचे काम खासदारांचे आहे का? त्यासाठी निधी मिळतो का? याचाही विचार ही मंडळी करायला तयार नाही. खासदारांना वार्षिक पाच कोटी विकास निधी मिळतो. म्हणजे पाच वर्षात 25 कोटी!  या 25 कोटीतून आज एक रस्ता तरी होऊ शकतो का? रस्ताच काय पाणीपुरवठ्याची पाईपलाईन अथवा कचरा प्रश्नाचा निपटाराही या पैशातून होऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही आश्‍वासन देताना जरा डोळे उघडे ठेवा! निवडून आल्यावर तुम्ही म्हणाल, महानगरपालिका माझ्या ताब्यात द्या, जिल्हा परिषद माझ्या ताब्यात द्या, तेव्हा मी विकास कामे करील! मग आता कुणाला उल्लू बनवताय.

 शहरवासीयांच्या भावनांचा फायदा उठवण्यासाठी स्थानिक प्रश्नांचा मुद्दा यांनी प्रचारात घुसवलाय.  खासदाराचे काम विमानसेवा, रेल्वे, दूरसंचार, पर्यटन सेवा, महामार्ग यासह मोठमोठ्या योजनांचा पाठपुरावा करून त्यांना गती देण्याचे आहे. गल्लीतले रस्ते, नळांचा पाणीपुरवठा अथवा कोपर्‍याकोपर्‍यावर पडलेला कचरा खासदारांनी डोक्यात ठेवला तर हजारो बेरोजगारांना काम देऊ शकेल का तो !  एमआयडीसीचे प्रश्न सोडवणे, डीएमआयसीत उद्योग खेचून आणणे, अशी कामे खासदार म्हणून करायला हवीत. तुम्ही तर खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करत आहात. शहरवासीयांनी  यावर विचार करायला हवा. दूरदृष्टीचा, उच्च विचारसरणीचा, मोठमोठे प्रकल्प आणि उद्योगधंदे खेचून आणणारा नेता निवडण्याची संधी आली आहे. ज्याचे दिल्ली दरबारी वजन असेल, लोकसभेत आक्रमकपणे प्रश्न मांडेल. लोकसभेच्या रिंगणातील उमेदवारांनी याच मु्द्यावर बोलायला हवे. म्हणूनच ये बात कुछ हजम नही हुई, असं लोक म्हणताहेत !

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker