मिस्टर हैदराबादी, कित्ती देर लगा दी आपने, आखें तरस रही थी ! रातोकी निंद खो दी ! इतकी बेकारारी ज्याच्यासाठी आहे तो हैदराबादी नवाब मिस्टर हैद्राबादी निघालाय औरंगाबादच्या स्वारीवर ! दोन्ही बाजूचे सैन्य ज्या सेनापतीची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते ज्या तोफेचा आवाज ऐकण्यासाठी औरंगाबादकरांचे कान आसुसले. तो हैद्राबादी आता सलग तीन आता सालटी सोलून काढणार हे. गंमत म्हणजे या नवाबाची जेवढी गरज एमआयएमला आहे त्यापेक्षा जास्त गरज शिवसेनेला आहे !ओवेसीच्या आगमनासाठी सेनेने देव पाण्यात ठेवले होते. अख्खी यंत्रणा आणि कोट्यवधी खर्च करून जी मते मिळणार नाहीत ती मते ओवेसीच्या एका सभेने परावर्तित होतील. म्हणूनच की काय सेनेवाले आजा रे माही तेरा रस्ता मै देखया... हेच गाणे आळवत होते. दीर्घ प्रतिक्षेनंतर जेव्हा बाबाची गाडी जेव्हा औरंगाबादकडे निघाली तेव्हा सेनेच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.कालच्या सभेत ओवेसी येऊन धडकणार म्हणून हजारोंचा जमाव जेव्हा घोषणा देत होता, तेव्हा शहराचा मध्य धगधगत होता. ओवेसीचे नावाचे तुफान औरंगाबादकडे निघाल्याने जर असा आवाज निघत असेल तर ओवेसी शहरात आल्यावर काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी ! आतापर्यंत निवडणुकीचे चित्र दोलायमान होते. निवडणूक कोणत्याच एका मुद्द्यावर केंद्रित झाली नाही. एका मुद्द्यावर निवडणूक केंद्रित करण्याचं सामर्थ्यही शहरातील एकाही नेत्यात नव्हतं हेही खरं ! खैरे विरोधी तयार झालेले जनमत आणि शहराच्या विकासाबाबत शहरवासीयांची नाराजी कँश करण्यात ना काँग्रेसला यश आले हर्षवर्धन जाधव यांना. त्यामुळे मतदारही गोंधळात सापडलेत.आता येत्या चार दिवसात मतदानाचं सेंटर निश्चित होईल. आतापर्यंत सभांचा तडकाच लागला नाही. औरंगाबादची निवडणूक ज्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहे तसा तडका अजूनही बसलेला नाही. त्यामुळे सळणारे रक्त, स्फुरणारे बाहू आणि गर्जणार्या घोषणा जणू गायब झाल्या. निवडणुकीची मजाच उरली नाही. आता उणेपुरे चार दिवस उरलेत. कालच्या रोशन गेट वरील सभेत काही नारे घुमले खरे मात्र तो आवाज सर्वदूर पोहोचलाच नाही. शिवसेनेचे भवितव्य ज्या नाऱ्यांवर अवलंबून आहे ते नारे जिल्हाभर घूमवेत अशी आशा लागून राहिलेले चेहरे आता हळूहळू उमलणार यात शंका नाही. हैदराबादी पठडीतले वाक्य आणि नवाबाचे टोकदार शब्द बाण घायाळ करतील. मराठवाड्यातल्या एकमेव मुस्लिम उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तो आकाश पातळ एक करेल. निवडणुकांचा प्रचार कसा असतो नवाब सांगेल. मुख्यमंत्र्यांची सभा सोडली तर निवडणुकांची वातावरण निर्मिती करणारी एकही सभा शहरात झाली नाही. काँग्रेसबाबत तर बोलायलाच नको. फर्डा वक्ता नसल्याने काँग्रेसची पार गोची झालीय. हातात आलेली खासदारकी काँग्रेस गमावणार का ?असा सवाल विचारला जात आहे. नतद्रष्ट कॉंग्रेसची मंडळीच याला जबाबदार असेल. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ओवेसी- खैरे असा सामना झाला तर सुभाष बाबू आणि हर्षवर्धन बाबूची वाटच लागली म्हणून समजा ! घोडामैदान सामने आहे... बघूया काय होते ते!