उलटा चष्मा: नो उल्‍लू बनाविंग...!

Foto

खोतकर यांच्या नाराजी नाट्याचा चित्रपट तब्बल महिनाभर चालला. क्षणाक्षणाला प्रेक्षकांची उत्कंठा वाढवलेल्या या चित्रपटाने चांगला गल्ला गोळा केला होता. अगदी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा समारोप करण्यात आला. भाजप-सेनेच्या या सुपरहिट चित्रपटाने मतदारांचा जीव टांगणीला लावला. या खेळाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना चेतवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला होता. आता बारी होती काँग्रेसची! अब्दुल सत्तार यांनी बंडाचे निशाण फडकावले अन् खोतकर पार्ट-2 चित्रपट प्रदर्शित झाला. गेले महिनाभर अब्दुल सत्तार यांचा चित्रपट स्थानिक पातळीवर गर्दी खेचत असला तरी राज्य पातळीवर या चित्रपटाला बॅन करण्यात आले. काँग्रेसच्या कोणत्याच मोठ्या नेत्यांनी या चित्रपटाची दखल घेतली नाही. काहीही करून चित्रपट आणखी दोन आठवडे पुढे चालूच ठेवायचा असा निश्‍चय केलेल्या सत्तार यांनी पुन्हा एकदा गुगली टाकली. काँग्रेसच्या मतदानात फूट पडू नये म्हणून मी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. आता घ्या डोक्यात मारून! ज्या काँग्रेसवर आगपाखड करून सत्तारांनी बंड केले त्याच काँग्रेसच्या मत विभागणीचा कळवळा सत्तारांना कसा आला ? असा प्रश्‍न पडला आहे. राजेंद्र दर्डा आणि सुभाष झांबड एकत्र येऊ शकतात तर मी आणि इम्तियाज जलील का नाही? असा आश्‍चर्यकारक सवालही सत्तरांनी  उपस्थित केला. सत्तारांच्या या चमत्कारिक वागण्याने लोकसभेचे चित्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. सत्तार कुणाला पाठिंबा देणार हे गुपित कायम आहे. परवा हर्षवर्धन जाधव यांच्या डोक्यावर हात ठेवणारे सत्तार काल इम्तियाज जलीलबाबत सहानुभूती दाखवत होते. चित्रपटाच्या कथेतील हे नाट्यमय वळण गुंतागुंतीचे ठरणार यात शंका नाही. एक विचार असाही व्यक्त होतो, तो म्हणजे जिल्ह्यात स्वतःची व्होट बँक असलेले सत्तार आणि  शांतिगिरी महाराज नाट्यमय खेळ करीत आहेत. बाबाजींनी निवडणूक लढणार नाही हे जाहीर करताना हिंदू मतांची विभागणी होऊ नये असे सांगितले होते.  आता सत्तार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेताना काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पडणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे समजदार को इशारा काफी है ! या लोकसभेची निवडणूक  भल्याभल्यांना  चकवा देणार असे दिसते. राजकीय विश्लेषकांचेही डोके गरगरले आहे.  झांबड यांना मुस्लिम समाज बाय-बाय करणार तर इम्तियाज जलील यांना दलित समाज टाटा करणार असा कयास लावला जातो.

 हर्षवर्धन जाधव कितीही बाह्या सरसावत असले तरी  राष्ट्रवादी त्यांना टांग मारेल असा दावा काही जण छातीठोकपणे करतात. चंद्रकांत खैरे यांच्या वैयक्तिक संबंधाने मुस्लिम आणि दलित समाजाची काही प्रमाणात मते त्यांच्याकडे वळू शकतात, असाही अंदाज लावला जात आहे. त्यातच सत्तार आणि बाबाजींनी बंद मुठ्ठी ठेवली आहे. 

त्यामुळे अजूनही ‘हार-जीत’चे चित्र स्पष्ट होत नसल्याने उत्सुकता वाढली आहे. सत्तारांनी आणि बाबाजींनी मतदारांना उल्लू बनवू नये!  थेट पाठिंबा जाहीर करावा आणि हा चित्रपट संपवावा, असे बोलले जाते

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker