शोले चित्रपटात पळपुट्या सैनिकांना जसा गब्बरसिंग विचारतो,अबे वो कालिया, कितने आदमी थे ? या लोकसभेच्या चित्रपटात जर गब्बरसिंग असता तर विचारलं असतं, कितनी पार्टीया है मोदी खिलाफ ? याचं कारण म्हणजे 56 पक्ष एकत्र येऊनही मोदींवर करारा प्रहार करू शकले नाहीत, ते एकट्या राज ठाकरेनी करून दाखवलं! म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना राज ठाकरे यांच्या प्रचारसभा अख्ख्या महाराष्ट्रात हव्या होत्या. ईव्हीएमचं बटन असं दाबा की, ही दोघे राजकीय पटलावरून नेस्तनाबूत व्हायला हवीत. व्वा ! काय बोलले राज साहेब. तुमच्या त्या चौकीदार चोर है च्या घोषणेपेक्षा हा करारा फटका वर्मी बसला, हे लक्षात घ्या. तोलून-मापून फेकलेले शब्द, अचूक घेतलेला प्रश्नांचा वेध, आणि जनमाणसाच्या मनाचा ठाव घेणारा विचार, ही साहेबांच्या भाषणाची वैशिष्ट्ये ! 56 पार्ट्यांना जे जमलं नाही ते वक्ता सहस्रेषु असलेल्या राजनी एका फटक्यात करून दाखवलं. देशात दोनच राजकीय विचार आहेत. मोदी समर्थन आणि मोदी विरोध. या दोनच मुद्द्यावर निवडणूक केंद्रित होईल. इतर राजकीय पक्षांचे अस्तित्व फारसे जाणवणार नाही. अशा अटीतटीच्या प्रसंगी मोदी विरोधाची जणू पोकळीच निर्माण झालीये. देशपातळीवर मोदींना सडकून काढेल असा नेताच नाही.
राहुलच्या भाषणाला श्रोते दाद देत नाहीत. प्रचंड उणिवा असलेले राहुल यांचे भाषण श्रोत्यांच्या मनाला भिडत नाही. अन् काँग्रेस कडे सभा जिंकणारे वक्ते नाहीत. महाराष्ट्रात तर ही उणीव अधिकच भासते. राष्ट्रवादीची तीच अवस्था आहे. एकट्या धनंजय मुंडेंनी आतापर्यंत किल्ला लढवला. राष्ट्रवादीलाही सभा जिंकणारा वक्ता हवाय. शिवसेनेची तीच अवस्था आहे. मोदी विरोध करताना सभा जिंकणार्या वक्त्याची उणीव सेनेलाही भासली. या सगळ्या घडामोडीत राज ठाकरेंची शैली उजळून निघाली. आज राज्यात मैदान गाजवणारा नेता नसल्याची नेमकी हीच संधी राज साहेबांनी हेरली. लोकसभेच्या मैदानात मनसेचे उमेदवार नसले तरी मोदी विरोध हा विचार घेऊन लोकमानस जागवले. साहेबांच्या सभेनंतर आता मोदी विरोधाची धार तीव्र झाली आहे. येणार्या काळात राज नावाचे एक वादळ मोदी विरोधकांच्या मनात घर करून बसेल. खरी गंमत इथेच आहे ! मोदी विरोधकांना हवा असलेला नेता, तडफदार वक्ता, झोडपून काढणारा आपला माणूस गवसतो आहे. मोदी विरोधकांची मते खेचण्यात राज यशस्वी झाले तर विधानसभेला राजसाहेबांची पार्टी दस्तक देऊ शकते. मोदीविरोधात काँग्रेस आघाडी लढा देऊ शकत नाही असा विचार मतदार करू लागले तर राजसाहेब समर्थ पर्याय म्हणून समोर येऊ शकतात. मोदी विरोधाचे कट्टर हत्यार म्हणून राज साहेब लोकांची पहिली पसंत असतील. काँग्रेस-राष्ट्रवादीला हे अद्याप उमगलेले नाही.
मोदी समर्थन आणि मोदी विरोध या दोन्ही जागांमध्ये राज मोदी विरोधकाची जागा बळकावून पाहत आहेत. आघाडीने त्यांना स्टार प्रचारक करून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला. येणार्या काळात हे त्यांना पुरेपूर कळून येईल यात शंका नाही. आज तरी मोदी विरोधात राजसाहेबांचा पर्याय हळूहळू का होईना लोकांच्या मनात पक्के घर करतोय. म्हणूनच 56 पक्ष असतानाही एकटा राज ठाकरे मोदी भक्तांना पळवून लावतो, हे चित्र उभ्या महाराष्ट्राने काल पाहिले. म्हणूनच गब्बरसिंग म्हणतोय, 56 पार्टीया और वो साला एक... फिरभी !