मुंबई : अमेरिका-इराण युद्धाची वाढती तीव्रता आणि शांतता कराराबाबतची अनिश्चितता यांसारख्या कमकुवत संकेतांमुळे, शुक्रवार, 27 मार्च रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला. जागतिक स्तरावर, आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण झाली, तर अमेरिकन शेअर बाजार रात्रभरात मोठ्या घसरणीसह बंद झाला, ज्यात नॅसडॅक 2% पेक्षा जास्त घसरला.
बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स 799.14 अंशांनी (किंवा 1.06 टक्क्यांनी) घसरून 74,474.31 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 245.05 अंशांनी (किंवा 1.05 टक्क्यांनी) घसरून 23,061.40 वर व्यवहार करत होता. या दरम्यान सुमारे 773 शेअर्समध्ये वाढ झाली, 1847 शेअर्समध्ये घसरण झाली आणि 240 शेअर्सचे भाव स्थिर राहिले.
सकाळी 10:50 वाजता, सेन्सेक्स 1,097.47 अंशांनी (किंवा 1.46 टक्क्यांनी) घसरून 74,175.98 वर, तर निफ्टी 330.90 अंशांनी (किंवा 1.42 टक्क्यांनी) घसरून 22,975.55 वर व्यवहार करत होता. या वेळी सुमारे 795 शेअर्समध्ये वाढ झाली, 2,963 शेअर्समध्ये घसरण झाली आणि 121 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. सकाळी 11:25 वाजता, सेन्सेक्स 1,224.07 अंशांनी (किंवा 1.63%) घसरून 74,049.38 वर होता, तर निफ्टी 360.80 अंशांनी (किंवा 1.55%) घसरून 22,945.65 वर व्यवहार करत होता.
गुंतवणूकदारांना पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान
सकाळी 9.40 वाजता सेन्सेक्स सुमारे 1,000 अंशांनी घसरून 74,272 वर पोहोचला, तर निफ्टी 50 291 हून अधिक अंशांनी खाली येत 23,050 वर व्यवहार करत होता. या तीव्र घसरणीमुळे, बाजार उघडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलातून सुमारे 5 लाख कोटी रुपये कमी झाले आणि हे भांडवल घसरून 426 लाख कोटी रुपयांवर आले.
कोणते शेअर्स वाढले आणि कोणते घसरले?
निफ्टीमधील वाढ नोंदवणाऱ्या प्रमुख शेअर्समध्ये टीसीए, एचसीएल, इन्फोसिसि, कोल इंडिया आणि ओएनजीसी यांचा समावेश होता. तर टाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेइकल, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, एल अँड टी आणि इंटरग्लोब एव्हिएशन हे शेअर्स सर्वाधिक घसरले.
नजीकच्या काळातही बाजार अस्थिर राहणार
बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार, व्ही.के. विजयकुमार म्हणाले, युद्धाशी संबंधित बातम्या आणि घडामोडींवर बाजारात जी चढ-उतार दिसून येत आहे, ती नजीकच्या काळातही अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे. ब्रेंट क्रूडच्या किमती पुन्हा एकदा उसळून सुमारे 108 डॉलर्सच्या पातळीवर पोहोचल्यामुळे, भारतीय बाजारात पुन्हा एकदा जोखीम-टाळण्याची लाट उसळण्याची शक्यता आहे.
तर बाजाराचे मूल्यांकन पुन्हा घसरू शकते
युद्ध सुरू झाल्यापासून बाजारात झालेल्या सुधारणेमुळ, निफ्टीचे मूल्यांकन आता वाजवी पातळीवर आले आहे. निफ्टी सध्या सुमारे 19 पट मूल्यांकनावर व्यवहार करत आहे, ही पातळी गेल्या 10 वर्षांच्या 22.4 पट सरासरीपेक्षा कमी आहे. परंतु, या ऊर्जा संकटामुळे भारताच्या स्थूल आर्थिक निर्देशकांवर जर प्रतिकूल परिणाम झाला, तर आर्थिक वर्ष 2027 मधील नफा-वाढीवर होणाऱ्या संभाव्य परिणामाचा अंदाज घेऊन, बाजाराचे मूल्यांकन पुन्हा घसरू शकते.