चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी दक्षिण भारताच्या राजकारणाला मोठा धक्का दिला आहे. अभिनेता थलापती विजय याच्या TVK (तमिलगा वेत्री कळघम) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत १०० हून अधिक जागांवर आघाडी घेत सत्ताधारी द्रमुकला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. या विजयाच्या लाटेत आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे, विजय यांचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एस.ए. चंद्रशेखर यांनी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काँग्रेससाठी दुसऱ्या राज्यात सत्तेची संधी?
केरळमध्ये काँग्रेसप्रणीत UDF ला मिळणारे स्पष्ट बहुमत आणि आता तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला मिळणारी आघाडी यामुळे काँग्रेससाठी हे 'डबल बोनान्झा' ठरू शकते. तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला बहुमतासाठी ११७ जागांची गरज भासल्यास काँग्रेस 'किंगमेकर'च्या भूमिकेत येऊ शकते. काँग्रेसने टीव्हीकेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. यावर आता थलापती विजयच्या वडिलांकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
स्टॅलिन यांच्या 'इंडिया' आघाडीत फूट?
निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि डीएमके 'इंडिया' आघाडीत एकत्र होते. मात्र, मतमोजणीदरम्यान मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन स्वतःच्या मतदारसंघात पिछाडीवर गेल्याने आणि टीव्हीकेने मुसंडी मारल्याने समीकरणे बदलली आहेत. विजय यांच्या वडिलांनी काँग्रेसला दिलेले हे संकेत तामिळनाडूमध्ये 'द्रविडी' राजकारणाचा अंत आणि एका नवीन युगाची सुरुवात असल्याचे मानले जात आहे.
विजय यांच्या घरी जल्लोष
टीव्हीकेच्या या अनपेक्षित यशानंतर विजय यांच्या चेन्नईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली आहे. "तमिळनाडूने परिवर्तनाला कौल दिला आहे," अशी भावना विजय यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. आता काँग्रेस हायकमांड या निमंत्रणावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.