नवी दिल्ली : मंगळवारी संध्याकाळी इराणच्या एकमेव अणुऊर्जा प्रकल्प, बुशेहरवर, एका क्षेपणास्त्राने हल्ला केल्याने संपूर्ण प्रदेशात घबराट पसरली. प्रकल्पाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती समोर आली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ही घटना अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या तिसऱ्या आठवड्यात घडली. यामुळे अणु अपघाताचा धोका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
रशियाही आता अमेरिकेसारखाच वागू लागला! भारताला नाकारून पाकिस्तानला स्वस्त दराने तेल देणार
इराणने तात्काळ आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला सूचित केले. संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा देखरेख संस्थेने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर लिहिले की, इराणने कळवले आहे की मंगळवारी संध्याकाळी बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाच्या संकुलावर एक क्षेपणास्त्र आदळले. या प्रकल्पात किंवा कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही हानी झाली नसल्याचे एजन्सीने स्पष्ट केले.
आयएइएचा इशारा
आयएइएचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी संघर्षादरम्यान सर्व पक्षांना कमाल संयम बाळगण्याचे तात्काळ आवाहन केले. त्यांनी सांगितले की, अणुऊर्जा प्रकल्पांजवळ कोणताही हल्ला झाल्यास गंभीर अणु दुर्घटना घडू शकते. इराणच्या अणुऊर्जा संघटनेनेही या हल्ल्याची पुष्टी केली आहे. तस्निम वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बुशेहर या बंदर शहरातील प्रकल्पाजवळ सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा क्षेपणास्त्र पडला. अणु ऊर्जा प्रकल्पाचे कोणतेही नुकसान झाले नाही. रेडिएशनचा स्तर सामान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.या घटनेमुळे प्लांटच्या सुरक्षा प्रणालीबद्दल निश्चितच प्रश्न निर्माण झाले आहेत, पण सध्या तरी कोणतीही मोठी समस्या नोंदवण्यात आलेली नाही.
रशियाच्या रोसाटॉमने हल्ल्याचा निषेध केला
रशियाची सरकारी अणुऊर्जा कंपनी, रोसाटॉमने, या हल्ल्याचा निषेध केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, बुशेहर प्रकल्पाच्या परिसरातील किरणोत्सर्गाची पातळी पूर्णपणे सामान्य आहे. या प्रकल्पाचे बांधकाम 1970 च्या दशकात एका जर्मन कंपनीने सुरू केले होते आणि नंतर रशियाने ते पूर्ण केले. कोणताही अपघात टाळण्यासाठी प्रकल्पाजवळ कोणतीही कृती करण्यापासून परावृत्त होण्याचे आवाहन रोसाटॉमने सर्व पक्षांना केले आहे.
बुशेहर प्रकल्प हा इराणचा एकमेव कार्यरत अणुऊर्जा प्रकल्प असून तो पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. हा परिसर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या घटनेनंतर तेथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे.