अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार ...

Foto
 तेहरान  : अमेरिका आणि इस्रायलचे इराणवरील हल्ले अद्याप सुरू असून, इराणही प्रत्येक हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्पआणि बेंजामिन नेतन्याहू यांनी दावा केला आहे की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इराणी माध्यमांनीदेखील खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केल्याचे वृत्त आहे. आता खामेनी नेमके कसे मारले गेले? याबाबत माहिती समोर आली आहे.

मीडिया अहवालांनुसार, खामेनी हे सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रमुख मोहम्मद पाकपूर यांच्यासोबत बैठक घेत असताना इस्त्रायलने त्या ठिकाणी स्ट्राइक केला. हा हल्ला काल करण्यात आल्याचे सांगितले जाते. रिपोर्ट्सनुसार, इस्त्रायल आणि अमेरिका अली शमखानी यांचा सातत्याने मागोवा घेत होते. शनिवारी ते खामेनी यांना भेटण्यासाठी गेले असताना, दोन्ही देशांनी संयुक्तरीत्या खामेनी यांच्यावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात 86 वर्षीय इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

दरम्यान, खामेनी यांच्या सोबत कुटुंबातील आणखी चार सदस्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणी माध्यमांनीही या बातमीची पुष्टी केल्याचे सांगितले जाते. ङ्गप्रेस टीव्हीफने खामेनी आता हयात नसल्याचे वृत्त दिले आहे. त्यांच्या निधनानंतर 40 दिवसांच्या राष्ट्रीय शोकाची घोषणाही करण्यात आली आहे.  मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती कायम आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने अनेक अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. दरम्यान, रविवारी (1 मार्च 2026) खामेनी यांच्यासह त्यांच्या मुलगी, जावई आणि नात यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दावा केला की, 86 वर्षीय आयतुल्लाह अली खामेनी यांचा एका लष्करी मोहिमेदरम्यान मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये खामेनी यांना इतिहासातील सर्वात वाईट व्यक्तींमधील एक असे संबोधले आणि त्यांच्या मृत्यूला न्याय मिळाल्याचे म्हटले. यासोबतच ट्रम्प यांनी असेही नमूद केले की, मध्यपूर्वेत आणि जगात शांतता प्रस्थापित होईपर्यंत किंवा संपूर्ण आठवडा अखंडपणे बॉम्बहल्ले सुरू राहतील. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये बातम्या वेगाने पसरल्या असून परिस्थितीबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.