इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा; खामेनेई यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांच्याकडे सत्ता

Foto
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांची देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात अली खामेनेई यांच्या कार्यालयाला लक्ष्य करण्यात आलं होतं. 

कोण आहेत मोजतबा खामेनेई?

मोजतबा खामेनेई यांचा जन्म 1969 मध्ये मशहद शहरात झाला. त्यांचं शिक्षण धार्मिक वातावरणात झालं. इराण-इराक युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी रिव्होल्युशनरी गार्डमध्येही काम केलं होतं. ते दीर्घकाळापासून आपल्या वडिलांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. 

पडद्यामागून अनेक मोठ्या निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असायची असं म्हटलं जातं. त्यांनी कधीही कोणतंही मोठं सरकारी पद भूषवलं नसले तरी, ते आपल्या वडिलांचे विश्‍वासू सल्लागार होते. लष्कर आणि निमलष्करी दलांशी त्यांचे चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं.

2009 मध्ये चर्चेत आले होते मोजतबा खामेनेई

2009 मध्ये झालेल्या निदर्शनांच्या वेळीही मोजतबा खामेनेई यांचं नाव चर्चेत आलं होतं. आंदोलने कठोरपणे दडपून टाकण्यात त्यांनी भूमिका बजावली होती, असा आरोप काही लोकांनी केला होता. आता ते सर्वोच्च नेते बनल्यानंतर देशात नवीन राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. 

1979 च्या क्रांतीच्या वेळी घराणेशाहीच्या आधारावर सत्ता देण्यास विरोध करण्यात आला होता. त्यामुळे काही लोक त्यांच्या निवडीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत. सध्या लष्करी पाठबळामुळे मोजतबा खामेनेई यांना एक प्रबळ नेते मानले जात आहे.

उत्तराधिकाराच्या शर्यतीतील प्रमुख नावे

पुढील सर्वोच्च नेत्यामध्ये राजकीय क्षमता, नैतिक अधिकार आणि इस्लामिक रिपब्लिकशी निष्ठा असणे अनिवार्य आहे. या शर्यतीत काही महत्त्वाची नावे चर्चेत आहेत:

मोजताबा खामेनी (56)

सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा दुसरा मुलगा. पडद्यामागून मोठी सूत्रे हलवणारा मोजताबा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स () आणि बसिज दलाचा अत्यंत जवळचा मानला जातो. मात्र, इराणमध्ये राजेशाहीला विरोध करून क्रांती झाली असल्याने, पित्यानंतर मुलाकडे सत्ता जाणे (घराणेशाही) धर्मगुरुंच्या पसंतीस पडणे कठीण आहे. तसेच  उच्च श्रेणीतील धर्मगुरू नसल्याने तांत्रिक अडचणी येऊ शकतात.

अलीरेझा अराफी (67) 

खामेनींचे अत्यंत विश्‍वासू आणि अनुभवी व्यक्तिमत्व. अराफी सध्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सचे उपाध्यक्ष आहेत. ते तंत्रज्ञानात प्रगत असून त्यांना अरबी आणि इंग्रजी भाषांचे उत्तम ज्ञान आहे. खामेनींचा त्यांच्या प्रशासकीय कौशल्यावर मोठा विश्‍वास होता, परंतु सुरक्षा यंत्रणांशी त्यांचे संबंध तितकेसे दृढ नाहीत.

मोहम्मद मेहदी मिरबाघेरी (60) 

हे कट्टर पुराणमतवादी गटाचे प्रतिनिधित्व करतात. पाश्‍चिमात्य देशांचे कट्टर विरोधक असलेले मिरबाघेरी धर्मासाठी होणाऱ्या संघर्षात मोठी जीवितहानी झाली तरी ती योग्य मानतात. त्यांच्या टोकाच्या भूमिकेमुळे ते चर्चेत असतात.

हसन खोमेनी (50)

इस्लामिक रिपब्लिकचे संस्थापक अयातुल्ला खोमेनी यांचे नातू. कुटुंबाच्या वारशामुळे त्यांना मोठी मान्यता असली, तरी सुधारणावादी विचारसरणीमुळे त्यांना सत्तेपासून दूर ठेवले जाण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये त्यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्यात आले होते.

हाशेम हुसेनी बुशेहरी (60 च्या उत्तरार्धात)

असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सचे पहिले उपाध्यक्ष. ते खामेनींच्या जवळचे असले तरी त्यांचा देशांतर्गत प्रभाव मर्यादित आहे आणि लष्कराशी () त्यांचे जवळचे संबंध नाहीत.