सिल्लोड, (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. रुग्णांची होणारी गैरसोय, आरोग्य केंद्रांमधील अस्वच्छता तसेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनियमित उपस्थिती खपवून घेतली जाणार नाही. सतत गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. सिल्लोड येथील पंचायत समितीच्या सभागृहात सिल्लोड व सोयगाव तालुकास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी त्यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय कामकाजाचा तसेच संबंधित उपकेंद्रांमधील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. आरोग्य सुविधांबाबत प्राप्त तक्रारी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामातील दिरंगाईवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. अंधारी येथील वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच रुग्णांवरील उपचार, ओपीडी आणि अन्य रुग्णालयात रेफर केलेल्या रुग्णांचा अहवाल दर महिन्याला सादर करण्याचे निर्देश दिले.
तालुक्यातील पालोद येथील रुग्णालयासाठी २० बेड ची वाढीव सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव पाठविणे, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची अद्यावत व्यवस्था करणे, आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण करणे, तसेच पानवडोद, उंडणगाव येथील जीर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तालुक्यातील भवन येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीही प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.
रिक्त पदांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा. आरोग्य विभागातील रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आरोग्यमंत्री यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असून, या कामाला आता गती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. गेवराई सेमीसह इतर उपकेंद्रांमध्ये कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याबाबत त्यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीतील सर्व सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी नियमित आढावा बैठका घेण्यात याव्यात, असेही आमदार सत्तार यांनी स्पष्ट केले.
यावेळी तहसीलदार सागर वाघमारे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, गटविकास
अधिकारी रत्नाकर पगार, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, निकिता राजूबाबा काळे, अर्जुन पा. गाढे, सय्यद नासिर हुसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, संचालक नंदकिशोर सहारे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, अंबादास शिंदे, सत्तार बागवान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कैलास कागणे, सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश विसपुते, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहम्मद हनीफ यांच्यासह सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.













