अंबेलोहळ जि. प. गटातील मतमोजणीत अनियमितता, उमेदवाराकडून विभागीय आयुक्तांकडे तक्रार

Foto
अंबेलोहोळ गटातील पराभूत उमेदवारासह तिघांवर गंगापूरात गुन्हा दाखल

गंगापूर, (प्रतिनिधी) अंबेलोहळ जिल्हा परिषद गटातील उमेदवार विलास जयवंत सौदागर यांनी मतमोजणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. सौदागर यांच्या म्हणण्यानुसार, दुपारी ४ वाजता मतमोजणी सुरू असताना एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिनची अदलाबदल झाल्याचे निदर्शनास आले. त्या मशिनवरील सिरीयल क्रमांक व कंट्रोल युनिट क्रमांक जुळत नव्हते. त्यांनी याला हरकत घेत मतमोजणी थांबवण्याची मागणी केली. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की करून बाहेर काढले. 

त्यावेळी तीन ईव्हीएम मशिनांची मतमोजणी बाकी होती. सौदागर यांच्या अनुपस्थितीत उर्वरित मशिनांची मतमोजणी पूर्ण करण्यात आली. पुन्हा मतमोजणीची मागणी फेटाळण्यात आली. उलट सौदागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चौकशी करून संबंधित ईव्हीएम मशिन व व्हिडिओ चित्रीकरण जप्त करून दोर्षीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सौदागर यांनी केली आहे.

---  थेट राडा, हुजत आणि गोंधळ झाल्याची धक्कादायक ---

गंगापूर तालुक्यातील मुक्तानंद महाविद्यालयातील इनडोअर स्टेडियममधील मतमोजणी कक्षात सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी) सायंकाळी थेट राडा, हुजत आणि गोंधळ झाला. मतमोजणी सुरू असतानाच संगनमताने गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अंबेलोहोळ गटातील पराभूत उमेदवारासह तिघांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सचिन अंबादास वाघमारे (वय ५२, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय गंगापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास जयवंत सौदागर (रा. विटावा, ता. गंगापूर) व त्याच्यासोबतच्या २ ते ३ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुणें करीत आहेत.

लोकशाही प्रक्रियेवर घाला ?
मतमोजणीसारख्या अत्यंत संवेदनशील आणि पवित्र प्रक्रियेतच गोंधळ, धमक्या आणि हिंसक वर्तन झाल्याने लोकशाही प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गंगापूर तालुक्यातील व शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही टीका होत आहे. ९ फेब्रुवारी रोजी अंबेलोहोळ आसेगाव गणाची मतमोजणी सुरू असताना मशीन क्रमांकात तफावत असल्याचा आरोप करण्यात आला. मशीन बदलली आहे. असा संशय व्यक्त करत उमेदवार व प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी वाद घातल्याने वातावरण चिघळले, आणि मतमोजणी कक्षातच गोंधळ उडाला. परिस्थिती तणावपूर्ण बनताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून वातावरण नियंत्रणात आणले आहे.

- विलास सौदागर,
अंबेलोहळ, जि. प. गटातील उमेदवार