अजितदादा मुंबईत स्वबळावर लढण्याच्या तयारीत? नवाब मलिकांवरून मुंबईत युतीत फूट?

Foto
मुंबई : महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी महायुतीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात जागावाटपावर वाटाघाटी सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गट १२५ जागांवर लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय हालचालींमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. मात्र, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने याला कडाडून विरोध केला आहे. ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आम्ही युती करणार नाही, असे मत भाजप नेत्यांनी मांडले आहे.

मुंबईत एकला चलो रे ची भूमिका घेणार?

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अजित पवारांनी नवाब मलिक यांच्या नावाचा आग्रह धरल्याची माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला व्हावा, असे अजित पवार यांनी या बैठकीत म्हटले होते. मात्र याला कडाडून विरोध होत आहे. सध्या महायुतीमध्ये जागावाटपावरून आणि नवाब मलिक यांच्या नावावरून एकमत न झाल्यास, अजित पवार मुंबईत एकला चलो रे ची भूमिका घेण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून स्वतंत्र लढण्याची इच्छा

त्यासोबतच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महायुतीत राहून कमी जागा घेण्यापेक्षा स्वतंत्र लढून आपली ताकद दाखवून द्यावी, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये आहे. स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईतील अल्पसंख्याक मतांवर लक्ष केंद्रित करता येईल. जे महायुतीत राहिल्यास कठीण होऊ शकते, असेही बोललं जात आहे.

अजित पवार यांनी त्यांचा नियोजित नांदेड दौरा रद्द केला असून सध्या ते मुंबईतच महत्त्वपूर्ण बैठका घेत आहेत. आज संध्याकाळी ते नांदेडमध्ये प्रचारासाठी जाणार होते. पण त्यांनी मुंबईतील राजकीय घडामोडींना प्राधान्य दिले आहे. आज संध्याकाळी अजित पवार माणिकराव कोकाटे, नवाब मलिक आणि मुंबईतील प्रमुख नेत्यांच्या बैठका घेणार आहेत. ही बैठक संपल्यानंतर अजित पवार पूर्णवेळ राजकीय रणनीती ठरवण्यासाठी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.