इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला, नौदल प्रमुख अलीरेझा तंगसिरी ठार? युद्ध भडकण्याची शक्यता

Foto
तेहरान  : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीने आता एक नवे वळण घेतले आहे. इस्रायलनेइराणचे मोक्याचे ठिकाण असलेल्या बंदर अब्बास या बंदर शहरात हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सचे शक्तिशाली नौदल कमांडर अलीरेझा तंगसिरी एका इस्रायली हल्ल्यात ठार झाल्याचा खळबळजनक दावा एका इस्रायली अधिकाऱ्याने केला आहे. या घटनेमुळे मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करत गुप्त मोहीम राबवली. या हल्ल्याचा मुख्य केंद्रबिंदू बंदर अब्बास हे शहर होते, जे इराणचे सर्वात महत्त्वाचे नौदल केंद्र मानले जाते. या हल्ल्यात तंगसिरी ठार झाल्याची माहिती इस्रायलने दिली आहे.

अलीरेझा तंगसिरी कोण होते?
तंगसिरी हे इराणच्या सागरी रणनीतीचे मुख्य सुत्रधार मानले जात होते. त्यांच्या मृत्युच्या दाव्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या नौदलाला समुद्रात थेट आव्हान देणारी विधाने केल्यामुळे ते चर्चेत होते. इराणच्या नौदल शक्तीचा विस्तार आणि बंदर अब्बास सारख्या संवेदनशील तळाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. दरम्यान, तंगसिरी यांच्या मृत्युच्या वृत्ताला अधिकृत पुष्टी मिळाली, तर इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांना आणि विशेषतः नौदल मनोबलाला बसलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असेल.

युद्ध पेटण्याची शक्यता
इस्रायलकडून हा दावा करण्यात आला असला तरी, इराणने अद्याप आपल्या सर्वोच्च कमांडरच्या स्थितीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. बंदर अब्बास हा तळ संपूर्ण पर्शियन आखातावर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने, तेथील हल्ल्यामुळे इराणच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव वाढण्याची शक्यता आहे. आपल्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराण मोठी लष्करी कारवाई करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधील सुरक्षा संकट आणि कच्च्या तेलाच्या वाहतुकीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.