जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी प्रमाणपत्रे तातडीने द्या

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जन्म, मृत्यू तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रांची खातरजमा झाल्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्रे लवकरात लवकर देण्यात यावीत, अशा सूचना स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी दिल्या.
गुरुवारी सायंकाळी सभापती मकरिये यांनी सर्व सहायक आयुक्त व वॉर्ड अभियंत्यांची बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला. बैठकीदरम्यान जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्रांबाबत माहिती घेताना त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शक्यतो दोन दिवसांत किंवा जास्तीत जास्त सात दिवसांच्या आत प्रमाणपत्र संबंधितांना उपलब्ध करून द्यावे. याशिवाय त्यांनी कर वसुलीचाही आढावा घेतला.
प्रत्येक झोनला देण्यात आलेले उद्दिष्ट आणि आतापर्यंत झालेल्या वसुलीचा आढावा घेत असताना त्यांनी नाराजी व्यक्त
केली. कर वसुली प्रभावीपणे आणि सक्तीने करण्यात यावी, यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्तांनी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक झोनमध्ये अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणाबाबत शून्य सहनशीलता धोरण अवलंबण्याचे आदेश त्यांनी दिले.
मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत तसेच नाल्यांवरील सर्व अतिक्रमणे पावसाळ्यापूर्वी हटविण्यात यावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त कर वसुली विकास नवाळे, तसेच झोन एक ते दहा सर्व सहाय्यक आयुक्त आणि वार्ड अभियंता यांची उपस्थिती होती.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions