आज माझा तरी शेवट किंवा तुझा तरी; स्टेटस ठेवून पत्नीला भररस्त्यात संपवले !

Foto
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असणार्‍या पेठवडगाव शहरात काल बुधवारी सायंकाळी एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीचा भररस्त्यात, गजबजलेल्या बाजारपेठेत कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. विशेष म्हणजे, या कृत्यापूर्वी आरोपीने मोबाईलवर व्हाट्सअप स्टेटस ठेवून हत्येचा इशारा दिला होता. भर पावसात घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

संशयित आरोपी दीपक लाडू कांबळे (वय ३५, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) याने हे भयानक पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या मोबाईलवर एक धक्कादायक स्टेटस ठेवला होता. आज माझा तरी शेवट किंवा तुझा तरी शेवट, अशा आशयाचा संदेश त्याने सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या डिजिटल पुराव्यामुळे हा खून पूर्वनियोजित असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

ती माझी पत्नी आहे, तुम्ही पडू नका
हा भयानक प्रकार सुरू असताना परिसरातील काही धाडसी तरुणांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दीपकने त्यांना अत्यंत उद्धटपणे आणि थंड डोक्याने उत्तर दिले. ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका, असे ओरडून त्याने मध्यस्थी करणार्‍यांना दूर सारलं आणि अमृता यांच्यावर पुन्हा वार केले. त्यानंतर विषय संपवला असं म्हणत आणि मिशीवर ताव मारत घटनास्थळावरून तो फरार झाला.

 आठ वर्षांच्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत
अमृता आणि दीपक यांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दीपक अमृताच्या चारित्र्यावर संशय घेत होता, ज्यातून त्यांच्यात वारंवार कौटुंबिक कलह होत असे. सुखी संसाराचं स्वप्न पाहणार्‍या या जोडप्याचा अंत असा क्रूर होईल, अशी कल्पनाही सावर्डे ग्रामस्थांनी केली नव्हती.