छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रखर राष्ट्रभक्त होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण होते. सावरकरांचे विचार व कार्याचा प्रसार तरुण पिढीपर्यंत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले.
समर्थनगर येथील शासकीय विभागीय ग्रंथालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ६० व्या आत्मार्पन दिनानिमित्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून संतोष जाधव बोलत होते. सुरुवातीस स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ने मजसी ने परत मातृभुमीला, सागरा प्राण तळमळला या प्रसिद्ध गीताचे श्रवन केले.
सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयातील ग्रंथालय निरीक्षक आवजी गलांडे विभागीय ग्रंथालयाचे नागनाथ केसाळे, युवराज मुंडे, संतोष हंबर्डे, नारायण नागलोथ, जनार्दन बोलकर, प्रकाश राठोड आदींसह विभागीय ग्रंथालयाचे वाचक व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तांत्रिक सहाय्यक सुधाकर गायधनी तर आभार प्रदर्शन गोविंद खेडकर यांनी मानले.












