कोलकाता:‘जय श्री राम’चा नारा बंगाली संस्कृतीशी संबंधित नसून आता लोकांना मारहाण करण्यासाठी या नार्याचा वापर होत आहे असे विधान नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध अर्थशास्त्री अमर्त्य सेन यांनी शुक्रवारी केले. माँ दुर्गा बंगाली लोकांच्या आयुष्यात सर्वव्याप्त आहे. अमर्त्य सेन जाधवपूर विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी नाव न घेता भाजपावर निशाणा साधला आहे.
‘जय श्रीराम’चा नारा बंगाली संस्कृतीशी संबंधित नाही. आता राम नवमी सुद्धा लोकप्रिय होत आहे. यापूर्वी याबद्दल कधी ऐकले नव्हते. मी माझ्या चार वर्षाच्या नातीला तुझी आवडती देवता कुठली? असा प्रश्न केला. त्यावर तिने माँ दुर्गा असे उत्तर दिले. माँ दुर्गा आपल्या आयुष्यात सर्वव्याप्त आहे असे अमर्त्य सेन म्हणाले.
माझ्या मते लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’ या नार्याचा उपयोग केला जात आहे. देशाच्या काही भागांमध्ये लोकांवर जय श्री रामचा नारा देण्यासाठी सक्ती करण्यात आल्याचे प्रकार घडले असून नकार देणार्यांना मारहाण करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर अमर्त्य सेन यांनी हे विधान केले आहे.गरीबीच्या विषयावर ते म्हणाले की, फक्त गरीबांचे उत्पन्न वाढून त्यांची दुर्दशा संपणार नाही. प्राथमिक आरोग्य सुविधा, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेने गरीबी कमी होईल असे सेन म्हणाले. अमर्त्य सेन यांनी नाव न घेता भाजपावर निशाणा साधला आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते.