छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): श्री.1008 खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार व सकल जैन समाज तसेच एच.एन.डी.हॉस्टेल माजी विदयार्थ्याच्या वतीने संयुक्त विदयमाने पुणे येथील एच.एन.डी हॉस्टेल व भगवान महावीर जैन मंदिर सुमारे साढ़े तीन एकर क्षेत्रफळ असलेली मालमत्ता बिल्डर च्या घशात घालण्याचा डाव सेठ हिराचंद नेमीचंद स्मारक ट्रस्टच्या विश्श्वस्थाने घातला. धर्मादाय आयुक्ताकडुन त्याला मान्यता देण्यात आली आहे. हा समाजाचा मालमत्तेवर घाला घालण्याचा डाव असल्याचे आरोप सकल जैन समाज पुणे यांनी केला. त्यापाठोपाठ आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील सकल जैन समाज एकवटला असून आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील सकल जैन समाजातर्फे शांततेत मुकमोर्चा काढून अशा घटना यापुढे होऊच नये अशी मागणी केली.
सकल जैन समाज बांधवांनी आज सकाळी एचएनडी की धडकन है समाज की पहचान असे घोषवाक्याचे पोस्टर हाती घेऊन राजबाजार मंदिर मार्गे संस्थान गणपती मंदिर, शहागंज, चेलीपुरा मार्गे विभागीय आयुक्त कार्यालय मार्गे मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी पांढरे रंगाचे कपडे परिधान करून हाताला काळी फित लावून हाती पोस्टर घेऊन शांततेत मोर्चा काढला.
यावेळी पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी यांनी सांगीतले की, ही ट्रस्ट सार्वजनिक धर्मदाय ट्रस्ट आहे. येथे जैन समुदायातील विद्यार्थ्यासाठी वस्तीगृह म्हणुन वापर केला जातो व दिगंबर जैन महावीर जैन मंदिर आहे. हे ठिकाण भारतातील एकमेव ठिकाण आहे की, जेथे 18 दिवसांचे पर्युषण पर्व साजरे करण्यात येते. या वस्तीगृहात हजारो विद्यार्थी कमी खर्चात पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेर घरात शिक्षण घेऊन आपले भवितव्य घडवित आहे. विश्वस्तांनी यावर्षी येथील वस्तीगृह बंद केले आहे. केवळ दिगंबर जैन मंदिरात मर्यादित प्रवेश ठेवला आहे. सध्या या जागेचा ताबा बिल्डरने घेतल्याचे दिसुन येत आहे. अशा या प्रस्तावित विक्रीमुळे जैन समुदायाच्या विद्यार्थ्यासाठी वस्तीगृह सुविधा रद्द करण्यात येत आहे. परंतु हे अंत्यत चुकीचे आहे. वारंवार अशा घटना घडत आहेत. याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अशा घटना घडूच नये. अशी मागणी करण्यासाठी आज हा मूक मोर्चा सकल जैन समाज बांधवांनी काढला आहे.
यावेळी डॉ. प्रणामसागरजी महाराज, महावीर पाटणी, प्रकाश अजमेरा, संजय पहाडे, झुंबरलाल पगारिया, अनिलकुमार संचेती, अमोल मोगले, संजय पापडीवाल, चंद्रशेखर पाटणी, यतीन ठोळे, अरुण पाटणी, महावीर ठोळे, शैलेश चांदीवाल, अनुप पाटणी, अशोक गंगवाल, पियुष कासलीवाल, नरेंद्र अजमेरा, निलेश अजमेरा, ललित पाटणी, सावन चुडीवाल, आकाश पाटणी, सागर साकला, मनोज लोहाडे, स्वप्नील पाटणी, सौरभ बडजाते, अमित गंगवाल, सुयोग पांडे, शैलेश पहाडे, भारती बागरेचा, कविता अजमेरा, तनसुख झाम्बड, गोपाल कुलकर्णी, चंदा कासलीवाल, एम. आर. बडजाते, संजय पहाडे, प्रकाश ठोळे, अनुप पाटणी, नीता ठोळे, संजय पापडीवाल, प्रशांत शहा सह आदी सकल जैन समाज बांधव हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. यावेळी डॉ. प्रमाणसागर महाराज यांचे प्रवचन झाले. तसेच मोर्चात यावेळी पंचरंगी ध्वज हाती घेऊन लहानपणापासून ते वरिष्ठांपर्यत मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होता.
एकता का प्रतीक है एचएनडी; मंदिर अनमोल है...
सकल जैन समाज बांधवांनी आज सकाळी काढलेल्या मूक मोर्चात यावेळी हातात वेगवेगळ्या स्लोगन घेऊन पोस्टरद्वारे सर्वांचे लक्ष वेधले. त्यात एकता का प्रतीक है एचएनडी, मंदिर अनमोल है तसेच शांती से लडेंगे विरासत बचाएंगे, एचएनडी बचाओ, मंदिर बचाओ, समाज को एकजूट बनाओ,तसेच समाज की आस्था, समाज की पहचान एचएनडी और मंदिर हमारा अभियान याशिवाय मंदिर की गरिमा हॉस्टल की पहचान, इनको बचाना सबका अरमान तसेच सेव्ह एचएनडी, सेव्ह मंदिर, मिलकर रहेंगे, शांती से कहेंगे विरासत अपनी हम बचाएंगे, याशिवाय ना बिकने देंगे, ना टूटने देंगे एचएनडी को हम सब जोड़ेंगे.. अशा प्रकारच्या स्लोगनचे पोस्टर हाती घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जालना येथे सकल जैन समाजाचा भव्य मोर्चा
पुणे येथील महावीर जिनालय व होस्टेलच्या विक्री कराराच्या विरोधात आज जालना येथे सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणात संस्थेच्या काही सभासदांनी 3 एकर जमीन 311 कोटी रुपयांना विक्री केल्याचा आरोप करण्यात आला असून, या व्यवहाराला रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जालना जैन मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोटरसायकल रॅलीत मोठ्या संख्येने जैन बांधव सहभागी झाले.











