लासूरला जैन समाजाचा काळ्या फिती बांधून भव्य मूक मोर्चा

Foto
पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना दिले निवेदन 

गंगापूर, (प्रतिनिधी): पुणे शहरातील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने धर्मदाय आयुक्तांना खोटी आणि चुकीची माहिती सादर करून संस्थेची पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील सुमारे तीन एकर जागा बेकायदेशीर पद्धतीने विक्री केल्याचा आरोप समोर आला आहे. या गंभीर प्रकारामुळे देशभरातील जैन समाजामध्ये तीव्र आक्रोश आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लासूर स्टेशन येथील सकल जैन समाजाच्या वतीने सोमवारी (दि. २७ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता काळ्या फिती बांधून भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. मूक मोर्चाची सुरुवात जैन मंदिरापासून करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ निवेदन देऊन मोर्चाचे विसर्जन करण्यात आले. या वेळी जैन समाजाच्या प्रतिनिधींनी शिल्लेगाव पोलीस
भव्य मोर्चा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांना लेखी निवेदन देत या प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधित ट्रस्ट विश्वस्त मंडळावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.  मोर्चा पूर्णपणे शांततेत पार पडला. समाजातील नागरिकांनी कोणताही घोष न देता हातात काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला.

शांतताप्रिय समाजात आक्रोश : 
शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या जैन समाजात या प्रकारामुळे प्रचंड संताप उसळला आहे. पुण्यातील ट्रस्टकडून धर्मदाय आयुक्तांना चुकीची माहिती देऊन धर्मस्थळाशी संबंधित जागेचा अनुचित व बेकायदेशीर व्यवहार करण्यात आल्याचा आरोप समाजाने केला आहे.

संपूर्ण देशभरातील जैन बांधव या घटनेविरोधात आवाज उठवत असून, लासूरसारख्या ग्रामीण भागातही त्याचा निषेध नोंदवला गेला आहे. समाजाचा ठाम इशारा देत धर्मस्थळाशी बेईमानी सहन केली जाणार नाही असे या वेळी समाजाच्या वीतेने सांगितले.