जळगाव २०१९- भाजप अतिआत्मविश्वासात, शिवसेना सत्तेत असूनही विरोधक, राष्ट्रवादीचा संघर्ष सूरुच

Foto


जळगाव जिल्हा हा तसा मातब्बर राजकारण्यांचा जिल्हा. मधुकरराव चौधरी, अरुण गुजराथी, सुरेश जैन, एकनाथ खडसे, गिरीश महाजन अशा अनेक केंद्र आणि राज्य पातळीवर काम केलेल्या नेत्यांचा हा जिल्हा आहे. जळगावची केळी जितकी प्रसिध्द आहे तितकेच जळगावचे राजकारण ही प्रसिध्द आहे. सध्या जळगव जिल्ह्यात संख्याबळाचा विचार केला तर भाजप आघाडीवर आहे. जिल्ह्यात लोकसभेचे २ तर विधानसभेचे ११ मतदारसंघ आहे. यात लोकसभेचे दोन्ही खासदार भाजपचे आहे. विधानसभेच्या ११ मतदारसंघांपैकी भाजपचे ६ आमदार, विधानपरिषदेवर २ आमदार, जिल्हा परिषदेत सत्ता, बहुतांश नगरपालिकांमध्ये सत्ता भाजपचीच सत्ता आहे. विधानसभेच्या उर्वरित ५ मतदारसंघात ३ आमदार शिवसेनेचे, १ राष्ट्रवादी काँग्रेस आणि १ अपक्ष आमदार आहे.

२०१४ च्या मोदीलाटेत भाजपचे लोकसभेचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले होते. तर विधासभेत ही भाजपला चांगले यश मिळाले. मात्र भाजपमध्ये सध्या २ गट तयार झालेले आहेत. एक गट आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा तर दुसरा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा. जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसेंचे मोठ्याप्रमाणात वर्चस्व होते. मात्र मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून त्यांच्या वर्चस्वाला धक्काच बसला आहे. त्यांनी भाजपवर असलेली नाराजी अनेक सभांमधून उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका भाजपला येणाऱ्या निवडणूकीत बसू शकतो. मात्र दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन हे चांगलेच जोरात आहे. पक्ष देखील त्यांच्यावर मेहेरहबान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात जवळचे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. विरोधी पक्षातील नेत्यांसोबतही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. मात्र त्यांचा मतदारसंघ वगळता बाकीच्या मतदारसंघांवर त्यांची अजूनही पकड नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकांमध्ये ते कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल.

२००९ च्या विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आमदार निवडून आले होते. मात्र २०१४ ला राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीकडे अजूनही प्रभावी आणि आक्रमक चेहऱ्याचा अभाव आहे. असे असले तरी वेगवेगळ्या आंदोलनांमधून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे अस्तित्व कायम ठेवलेले आहे. आमदार सतीश पाटील यांनी वेळोवेळी जिल्ह्याच्या प्रश्नांवर आवाज उठवलेला आहे. लोकसभेच्या निवडणूकींसाठी विद्यमान आमदार सतीष पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची नावे चर्चेत आहे. त्यामुळे पराभवाची मरगळ झटकून भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज आहे.

शिवसेनेचा विचार केल्यास त्यांचे विधासभेचे तीन आमदार आहेत. मोठ्या प्रतिक्षेनंतर गुलाबराव पाटील यांच्या रुपाने शिवसेनेला राज्यमंत्रीपद मिळाले आहे. गुलाबराव पाटील हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिध्द आहे. एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाचे किंगमेकर समजले जाणारे सुरेशदादा जैन सध्या राजकारणापासून आलिप्त आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत जैन यांनी सहभाग घेतल्यास वेगळे चित्र बघण्यास मिळू शकते.

काँग्रेसची परिस्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात काँग्रेस आता फक्त नावापुरतीच उरलेली आहे. नेतृत्वाच्या अभावामुळे काँग्रेसच्या गोटात शांतता आहे.

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यात मोदी सरकार अपयशी- गुलाबराव पाटील, राज्यमंत्री

मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी आहे. शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेले नाही. जळगाव जिल्ह्यात विरोधी पक्ष म्हणून आम्हीच काम करतो. जिल्ह्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व शिवसेनेमुळेच टिकून आहे. येणाऱ्या निवडणूकांमध्ये शिवसेना बाजी मारेल असा विश्वास आम्हाला आहे.

 

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस मुक्त जळगाव जिल्हा करू- उदय वाघ, जिल्हाध्यक्ष भाजप

सत्तेत आल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्वाच्या योजना जिल्ह्यासाठी दिलेल्या आहेत. अनेक वर्षांपासून भकास असलेल्या जळगाव जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर आम्हीच आणले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत विधासभेच्या ११ जागांवर, लोकसभेच्या २ जागांवर भाजपचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास आम्हाला आहे.

 

जळगावचे दोन्ही मंत्री बिनकामाचे- योगेश देसले, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

जळगावला गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे दोन मंत्री आहे मात्र त्याचा काहीही उपयोग जिल्ह्याला झालेला नाही. सिंचनाचा १ टक्का ही वाढलेला नाही, चंद्रकांत पाटील यांच्यासारखा मंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री असतांना ते देखील नियोजन समितीची बैठक घेत नाही. गिरीश महाजन हे तर फक्त जामनेरचे मंत्री असल्यासारखेच वागतात. येणाऱ्या निवडणूकांमध्ये भाजपला जनता घरी पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहे.