शहराची लाईफ लाईन असलेल्या जालना रोडचा भराव नष्ट झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता आमच्या अखत्यारित नाही असे सांगून सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका आणि रस्ते विकास महामंडळाने हात वर केले आहेत. आता या रस्त्याच्या प्रश्नी पूर्व मतदार संघाचे आ. अतुल सावे यांनी लक्ष घातले आहे. या रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यावर भराव मनपाने टाकावा यासाठी आपण मनपा आयुक्तांशी बोलणार असल्याची माहिती आ. सावे यांनी सांजवार्ताला दिली.
शहराची लाईफ लाईन म्हणून ओळख असलेल्या जालना रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याशिवाय रस्त्याच्या बाजूचा भराव वाहून गेलेला आहे.
मनपा आयुक्तांशी चर्चा करणार ः आ. सावे
जालना रोडची दुरुस्ती आणि रस्त्याच्या भराव टाकण्याची जबाबदारी मनपाने घ्यायला हवी. हा रस्ता शहरातून जात आहे. त्यामुळे मनपानेच या रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी आपण मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्याशी चर्चा करणार आहोत व लवकरच काम करण्यास सांगणार असल्याचे आ. अतुल सावे म्हणाले.