जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या आरोपाने खळबळ उद्या पत्रकार परिषदेत पुरावे जाहीर करण्याचा इशारा, थोरली बेगम म्हणून उडवली रामदास कदम यांची खिल्ली !!

Foto
जालना  : काल नारायण गडावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी मराठा समाज अजून भक्कम, मोठा झाला पाहिजे असं उपस्थितांना आवाहन केलं. या मेळाव्यात बोलताना त्यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला. एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपंकडून ५०० कोटी रुपये घेतले होते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात किंवा आज पर्यंत यावर खुलासा करावा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. आज मनोज जरांगे पाटील पत्रकारांशी बोलले. त्यावेळी उद्या ११ वाजता एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे देणार असे म्हटले आहे.

मी माझ्या समाजासाठी लढतोय. तो विषय सोडून द्या. पण मी उद्धवस्त होणार नाही, एवढा मराठा लेचापेचा नाही. त्याची काळजी करु नका. मी पाठपुरावा करु शकतो. मी आधी कोणाबद्दल बोलत नाही. पण पुढे येऊन कोण बोललं, तर मी सोडत नाही. कारण माझ्या समाजाच्या अस्तित्वाचा विषय आहे. तुम्ही समाज उद्धवस्त केलाय रे तुमच्यासाठी असं मनोज जरांगे पाटील बोलले. राणेंदादांचा विषय घ्या मोठ्या. मी त्यांना कधी बोललो नाही. त्यांच्या मुलांना बोललो. तसचं रामदासभाईंना सुद्धा बोललो नाही. एकेकाळचा चांगल्या प्रकारे भगव्यासाठी लढत होते. लहान असताना ऐकून आहोत, चांगला लढणारा माणूस. त्यामुळे मी काही बोलणार नाही. पण पुरावे पाहिजेत ना, उद्या ११ वाजता प्रेस घेऊन देतो असं मनोज जरांगे पाटील बोलले.

श्रीकांत शिंदे यांच्याकरवी मला ५०० कोटी रुपये देण्यात आले, ही गोष्ट खरी आहे का, याबाबत एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यावे. मी श्रीकांत शिंदे यांच्याकडून ५०० कोटी घेतले का, या प्रश्नाचे हो किंवा नाही इतकेच उत्तर द्या. माझा प्रश्न साधा आहे.  तुम्ही ५०० कोटी मला दिले का, शिंदे साहेबांनी याचे उत्तर द्यावे. त्यांनीच सांगितलं ना भाजपला, मी मनोज जरांगे यांना ५०० कोटी दिले. कारण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना तसे सांगण्याइतकी श्रीकांत शिंदे यांची उंची नाही. त्यामुळे ही गोष्ट एकनाथ शिंदे यांनीच भाजपला सांगितली असावी. ही गोष्ट खरी आहे किंवा नाही, एवढेच एकनाथ शिंदे यांनी सांगावे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. ते बुधवारी जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये कुजबूज, ते शुद्ध हिंदी आणि मराठी बोलतात: मनोज जरांगे पाटील
भाजपचे खूप मोठे नेते याबाबत बोलत आहेत. यामध्ये काही महिला आहेत, त्या खूप शुद्ध हिंदी बोलतात, बाकीचे महाराष्ट्रातील असावेत. मला काय माहिती हे मोठे लोक आपल्याला ओळखतात. ते इतकी शुद्ध भयानक मराठी बोलतात की, ते सगळा मराठी शब्दकोश व्याकरणासहित हाताळू शकतात. इतके ते शुद्ध बोलतात. आम्ही एकनाथ शिंदे यांना जाब का विचारु नये. आम्ही तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्यात, तुम्हाला डोक्यावर घेतले होते. मग तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं का देऊ नयेत. एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्याकरवी मला ५०० कोटी रुपये दिले का, हे सांगावे. का त्यांनी भाजपकडून पैसे घेतले आणि आम्हाला दिले नाहीत, हे स्पष्ट करावे, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना दिले.

रामदास कदम यांचा थोरली बेगम म्हणून उल्लेख !! 
काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिंदे सेनेच्या सर्व प्रमुख नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले होते. यामध्ये रामदास कदम आघाडीवर होते. रामदास कदम यांनी मनोज जरांगे यांची औकात काढत पुन्हा एकनाथ शिंदेंविरोधात बोलू नये, असा सज्जड दम भरला होता. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी रामदास कदम यांना उल्लेख थोरली बेगम असा केला. मी तुमच्याकडे एका साध्या प्रश्नाचे उत्तर मागितले. मात्र, तुम्ही चिडताय, बावचळून गेला आहात. तुम्ही मला ५०० कोटी रुपये दिले का, याबाबत हा किंवा नाही म्हणा. भाजप तुम्हाला संपवतंय की तुम्ही मला संपवताय , या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे, थोरल्या बेगमला हे कळालं पाहिजे. थोरली बेगम बोलली ना काल, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी रामदास कदम यांची खिल्ली उडवली.

रामदास कदम म्हणतात माझ्या संपत्तीची चौकशी करा. त्यांनी पक्षासाठी खूप काही केले आहे, खस्ता खाल्ल्या आहेत, हे मी ऐकून आहे. तुम्ही उगाच चिडचिड करु नका. थोरल्या बेगमला शेवटी चोमडेपणा करावा लागला. पण तुम्ही चिडचिड करण्यापेक्षा मी काय बोललो हे समजून घ्या. मला औकात आहे का, मला स्वाभिमान आहे का नाही याबद्दल बोलण्यापेक्षा मराठ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलावे. एकनाथ शिंदे यांच्याविषयी स्वाभिमान नसता तर मराठ्यांनी त्यांना एवढ्या उंचीवर नेले नसते. मी साधा प्रश्न विचारला आहे की, मला श्रीकांत शिंदे यांच्याकरवी ५०० कोटी रुपये दिले का, फक्त त्याचं उत्तर द्या. मी वाट बघतोय शिंदे साहेब काय बोलतात. थोड्या दिवसांत कळेलच की आपण बोलण्याआधी विचार करायला हवा होता, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

जरांगेंच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा सवाल
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांबाबत गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून आपल्या नावाने एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.  या आरोपांवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत आरोप फेटाळून लावले आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे आरोप तथ्यहीन असून, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदेंना ईडीचं समन्स पाठवा : संजय राऊत
दरम्यान जरांगे यांच्या या आरोपानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयने दखल घेतली पाहिजे. एकनाथ शिंदे यांना तातडीने समन्स बजावून या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीच संजय राऊत यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधातना ही मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपये खाल्ल्याचा आरोप केला. त्यावर शिंदेंनी बोललं पाहिजे, असे आव्हानही जरांगेंनी दिले होते. दसरा मेळाव्याच्या सभेत उत्तर देण्यास सांगितलं होतं. शिंदेंनी भाजपकडून मला गप्प करण्यासाठी ५०० कोटी घेतले, असं जरांगे म्हणतात. जो माणूस ५०० कोटी रुपये भाजपकडून घेतो, त्या माणसाची लायकी काय आहे? तो कुणावर बोलतो? ठाकर्‍यांवर? रिजिम चेंजवर? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.