स्थायी समिती सभापतिपदी जयश्री कुलकर्णी; पहिल्यांदाच मिळाली महिलेला संधी

Foto
औरंगाबाद: मनपा  स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवारीवरून भाजपात दोन गट पडल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. त्यात दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज मंगळवारी मनपात  सभापती पदाकरिता निवडणूक प्रक्रिया पार पाडली. तत्पूर्वी राजू शिंदे यांनी माघार घेतल्याने जयश्री कुलकर्णी  विरुद्ध एमआयएमचे नासिर सिद्दिकी अशी निवडणूक पार पडली यात कुलकर्णी यांनी अकरा मते घेत सिद्दिकी यांचा पराभव केला. कुलकर्णी यांच्या निवडीने मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती सभापती पदी महिला विराजमान झाली आहे. 


युतीतील करारानुसार  यंदाचे सभापतिपद हे भाजपच्या वाट्याला आले आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत युतीमधील उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव व स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत उमेदवारीवरून भाजपत पडलेले दोन गट त्यामुळे स्थायी समिती सभापतीची निवडणुकीतील रंगत वाढली होती. यात भाजपचा राजू शिंदे व जयश्री कुलकर्णी या दोन उमेदवारांनी सभापती पदाकरिता अर्ज दाखल केले होते. तेव्हापासून माघार कोण घेणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा ऐकायला मिळाली. आज मंगळवारी सकाळी स्थायी समिती सभागृहामध्ये सभापती पदाकरिता निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सेना भाजपचे सदस्य आपल्या पक्षाच्या झेंड्या प्रमाणे फेटे परिधान करून आले होते. प्रारंभी अर्ज मागे घेण्यात करिता देण्यात आलेल्या दहा मिनिटांमध्ये राजू शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे एमआयएमचे नासीर सिद्दिकी तर भाजपाच्या जयश्री कुलकर्णी या दोन उमेदवारांत थेट लढत झाली. यात कुलकर्णी यांना शिवसेना सदस्‍यांची 6, भाजपची 3, शहर विकास आघाडीचे 2 असे एकूण अकरा मते मिळाली. तर सिद्दीकी यांना चार मते मिळाले. काँग्रेसचा एक सदस्य तटस्थ राहिला. कुलकर्णी यांच्या निवडीने स्थायी समिती सभापतीपदी पहिल्यांदाच महिला सदस्य विराजमान झाली आहे.

शिंदे यांच्या उमेदवारी बाबत काय म्हणाले पदाधिकारी..?
यावेळी शिंदे यांच्या दाखल करण्यात आलेल्या उमेदवारीबाबत शिरीष बोराळकर यांनी गैरसमजातून अर्ज दाखल झाला असल्याचे सांगितले. यानंतर शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी हे प्रकरण कोअर कमिटी समोर ठेवून चर्चा करू, कमिटी त्यावर निर्णय घेईल असे सांगितले.


खैरे यांनी दिले कुलकर्णींना आशीर्वाद...म्हणाले मी मनपात पाहूणा !
ही निवडणूक पार पडताच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे मनपात दाखल झाले. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित सभापती जयश्री कुलकर्णी यांच्या दालनात जाऊन सत्कार करत त्यांना आशीर्वाद दिले. यावेळी माध्यमांशी बोलताना खैरे यांनी मी सहसा मनपात येत नाही. वर्षातून केवळ दोन वेळाच मनपात येतो आज पाहुणा म्हणून आलो असे खैरे पहिल्यांदाच म्हणाले. सभागृहनेता बदलाबाबत त्यांना विचारले असता याबाबत उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असे सांगत कुणाचेही नाव न घेता कोणीतरी आम्हाला आम्ही त्यांचा झेंडा उतरवला अशा शब्दात धमकी देत आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यात युतीचा झेंडा फडकविण्या करिता जोमाने प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत मात्र त्यांनी बोलणे टाळले.