मुंबई : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. १९९३ साली घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत परब यांनी रामदास कदम यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यावेळी रामदास कदम यांच्या बायकोनं पेटवून घेतलं की त्यांना जाळलं? अशा प्रश्न उपस्थित करत परब यांनी रामदास कदम यांच्यावर संशय व्यक्त केला. दरम्यान अनिल परबांच्या आरोपांवर आता रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. १९९३ साली आपल्या पत्नीसोबत नेमकं काय घडलं होतं? याचा सगळा घटनाक्रम रामदास कदम यांनी सांगितला आहे.
पत्नीला कथितपणे जाळल्याच्या केलेल्या आरोपांबद्दल रामदास कदम म्हणाले, "ज्यावेळी घटना घडली, तेव्हा माझ्या घरात दोन स्टोव्ह होते. माझी पत्नी स्टोव्हवर जेवण बनवत होती. त्यावेळी बायकोच्या साडीला पहिल्यांदा आग लागली, मग भडका उडाला. तेव्हा मी स्वत: तिला वाचवलं. माझा जळलेला हात अजूनही याचा साक्षीदार आहे. माझ्या पत्नीला मी वाचवलं. या घटनेनंतर सहा महिने माझी पत्नी रुग्णालयात अॅडमीट होती. मी स्वत: तिथे रुम घेऊन तिच्यासोबत थांबलो होतो. त्यामुळे तू आम्हाला काय सांगतो असले धंदे, आजही आम्ही जीवाभावाने संसार करतो. आता तू जी माझी बदनामी केली आहे. त्याच्यावर मी दावा टाकणार आहे."
अनिल परब नेमकं काय म्हणाले होते?
गृहराज्यमंत्री योगेश कदमांना आव्हान देताना अनिल परब म्हणाले, "१९९३ साली तुझ्या आईनं आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला, स्वत:ला जाळून घेण्याचा का प्रयत्न केला, याची चौकशी कर. रामदास कदमांच्या पुतण्याने का आत्महत्या केली? याची चौकशी करा. घरातील लोक आत्महत्या करत आहेत. कशासाठी करत आहेत. हे बाहेर आलं पाहिजे."
"ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, त्यांनी जाळून घेण्याचा का प्रयत्न केला, जाळून घेण्याचा प्रयत्न केला की जाळलं, याची चौकशी झाली पाहिजे, आजही खेडमध्ये याचे साक्षीदार आहेत. वेळ पडली तर मी त्यांनाही समोर आणू शकतो, खूप जण त्याचे साक्षीदार आहेत. ते स्वत: समोरून सांगतात की आम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहोत. म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून ही प्रवृत्ती बंद करा", असंही अनिल परब म्हणाले.