३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
कन्नड, (प्रतिनिधी) : कन्नड तालुक्यात विविध कारणांमुळे बंद झालेली सात स्वस्त धान्य दुकाने नव्याने सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी इच्छुक संस्थांकडून ३१ जुलै पर्यंत अर्ज मागविले असल्याची माहिती पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश राठोड यांनी दिली.
पुरवठा विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कविटखेडा, अंतापूर, लोहगाव, तळणेर, सोनवाडी, रोहिला आणि मोहाडी या सात गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकानांसाठी जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या दुकानांच्या मंजुरीसाठी ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्था तसेच महिला स्वयंसहायता बचत गट आणि महिलांच्या सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
इच्छुक अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह कन्नड तहसील कार्यालयात पुरवठा विभागाकडे ३१ जुलै २०२६ रोजी कार्यालयीन कामकाज संपेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश राठोड यांनी केले आहे.













