अतिक्रमण पथकाच्या हालचालींवर 'नजर'

Foto
जप्त केलेल्या मोबाईलमधून व्हॉट्सअॅप ग्रुपचा पर्दाफाश
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि पथकाच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तरुणांनी दोन स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केल्याची माहिती समोर आली आहे. मिटमिटा येथील कारवाईदरम्यान एका संशयित तरुणाचा मोबाईल जप्त केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या दोन्ही ग्रुपमध्ये नऊशेपेक्षा अधिक सदस्य असून, अतिक्रमण पथकाच्या लोकेशनचे फोटो आणि माहिती यावर शेअर केली जात होती. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत प्लॉटिंग व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. मागील तीन आठवड्यांमध्ये अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली शहरालगतच्या सातारा देवळाई, पडेगाव-मिटमिटा, पहाडसिंगपुरा, हनुमान टेकडी, हर्सल आदी भागात कारवाया झाल्या.
मनपाची परवानगी न घेता लेआऊट टाकून प्लॉट विक्री करणाऱ्यांना या कारवाईने चांगलाच दणका बसलेला आहे. मिटमिटा भागात कारवाईला जात असताना पथकाला दोन वाहनांतून पाठलाग केल्या जात असल्याचा संशय आला. त्यांनी या वाहनांवर नजर ठेवत त्यातील एका सुमारे ३० वर्ष वयोगटातील तरुणाला पकडून त्याची चौकशी केली. त्याच्याकडील स्मार्ट फोन ताब्यात घेतला. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
मोबाईलमध्ये गतवर्षीपासूनचा डाटा
तरुणाच्या मोबाईलमध्ये 'एमएच २० लोकेशन ग्रुप' आणि 'हातगाडी एमएच २० लोकेशन ग्रुप' या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केलेले असल्याचे व त्या ग्रुपवर पथकाची वाहने, अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती फोटोसह आणि व्हॉइस मेजेसद्वारे सदस्यांना कळविले जात होते. 'एमएच २० लोकेशन ग्रुप' मध्ये ८१६ तर 'हातगाडी एमएच २० लोकेशन ग्रुप' मध्ये ९३ सदस्य आहेत. पथकाच्या माहितीसंदर्भात या मोबाइलमध्ये सप्टेंबर २०२५ पासूनचा डाटा आहे.
← MH 20 लोकेन्शन ग्रुप
Message
गुन्हा दाखल करणार
पथकाचा पाठलाग केला जात असल्याचा संशय आल्यानंतर आम्ही मिटमिटा येथील कारवाईदरम्यान एका तरुणाची चौकशी केली होती. त्याची माहिती घेतल्यावर मोबाइल जप्त केला व त्याला सोडून दिले होते. त्याच्या मोबाइलमध्ये दोन व्हॉट्सअॅप ग्रुप दिसून आले. त्यात पथकाची माहिती कळविली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पथक सध्या कुठे आहे, कुठे चालले आहे. कोणत्या मार्गावर आहे. वाहनात कोण कोण आहेत आदी माहिती व्हॉइस मॅसेजद्वारे कळविली जात होती. यात मनपाचे कोणी अधिकारी, कर्मचारी आहेत का, याची तपासणी करत असून, लवकरच या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
संतोष वाहुळे, संनियंत्रण अधिकारी
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions