सिल्लोडमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले ४ लाखांचे खैर जातीची लाकडे जप्त

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): शहरातील सारा सिटी परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या खैर प्रजातीच्या लाकडावर वनविभागाने सोमवारी (९ जून) रोजी रात्री ११ वाजता छापा मारून सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अवैधरित्या साठवून ठेवलेला लाकडांचा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी एका पीकअप मध्ये जात होता तो पिकअप सुध्दा वनविभागाने जप्त केला.

मात्र पथकाला पाहून पिकअप चालक पसार झाला त्याचा शोध सुरू आहे. अज्ञात व्यक्ती विरुद्ध सिल्लोड वनविभागाने गुन्हे दाखल केले आहे. गोपनीय मिळालेल्या माहिती वरून सिल्लोड वनविभागाच्या पथकाने सारासिटी परिसरात छापा टाकला असता रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खैर प्रजातीच्या लाकडाचा साठा आढळून आला.

यावेळी लाकडाची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणारे महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एमएच ४३ एडी १९२२) घटनास्थळी दिसून आले. वाहन थांबवून तपासणी करण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन जागीच सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. तपासणीत वाहनामध्ये खैर प्रजातीच्या लाकडाच्या पाट्या आढळून आल्या. वनविभागाने सुमारे १३ टन वजनाचे (अंदाजे १५ घनमीटर) खैर लाकूड आणि संबंधित पिकअप वाहन जप्त केले. जप्त मुद्देमालाची बाजारभावानुसार किंमत सुमारे ४ लाख रुपये असल्याचे वनविभागाने सांगितले.

जप्त केलेला माल आयशर वाहनाच्या सहाय्याने शासकीय डेपोमध्ये सुरक्षित जमा करण्यात आला. याप्रकरणी जप्ती पंचनामा करून वनगुन्हा नोंदविण्यात आला असून, संबंधित आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा आणि उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक स्वप्नील भामरे, वनपरिक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपाक, वनपाल रेखा बरबडे, मनोज कांबळे तसेच वनरक्षक साईनाथ पवार, गणेश परदेशी, अजीम शेख, विजय कुंटे, सागर राजपूत, विशाल जाधव, अनिल इंगळे, कल्याण खोकड, एच. एस. सिद्दीकी आणि विलास नरवाडे यांनी केली. कारवाईसाठी सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे व पोलीस नाईक एस. सी. मोबिन यांनी सहकार्य केले.