नागपूर : अशोक खरात प्रकरण आता एका वेगळ्याच वळणावर आले आहे. नाशिकमध्ये एसआयटी कडून अशोक खरात आणि इतरांची कसून चौकशी सुरू आहे. त्याच वेळी या लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक प्रकरणात नवनवीन गोष्टींचा खुलासा होत आहे. या प्रकरणात अशोक खरात यांच्याशी निकटचे संबंध असल्याच्या आरोपानंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा लागला. चाकणकर यांच्या विरोधात पुरावे असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या अशोक खरात आणि रुपाली चाकणकर प्रकरणावर अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत फडणवीसांनी रविवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला.
अशोक खरात याच्यावर महिलांवर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप आहेत. खरात आणि रुपाली चाकणकर यांचे निकटचे संबंध असल्याने या प्रकरणाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यावर मुख्यमंत्री म्हणाले, "अशोक खरात याच्याकडून महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांचा राजीनामा आवश्यक होता असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
चाकणकरांविरोधात पुरावे?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे म्हटले की, रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. मात्र, महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीसोबत (अशोक खरात) त्यांचे जवळचे संबंध होते किंवा त्यांनी गुरुस्थानी मानले होते. अशा स्थितीत या विषयाला पूर्णपणे न्याय मिळणार नाही, हे त्यांनी मान्य केले. त्यामुळेच हा राजीनामा घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोणालाच सोडणार नाही...
खरात प्रकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "खरात यांचं प्रकरणं अत्यंत गंभीर आहे. इंटेलिजन्सच्या आधारवर आम्ही स्वत: याचा भांडाफोड केला आहे. आम्हाला आधीच कल्पना होती की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला पुढे येत नाहीत. आता पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर देऊन त्यांना समोर आणायचा प्रयत्न सुरू आहे. यात यशही येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली जात आहे. स्वत: डीजींनी याकडे लक्ष द्यावं, अशा सूचना मी दिल्या आहेत. एसआयटी तयार केली आहे. यात कुणालाही सोडलं जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.