पश्चिम बंगालमध्ये खेला होबे! ५९ आमदार बंडखोर झाले, ममता बॅनर्जींच्या मागे किती शिल्लक राहिले?

Foto
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. पक्षातून हकालपट्टी केलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांनी उघडपणे बंडखोरीचं आव्हान दिले आहे. तृणमूल काँग्रेसमधील ५९ आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या पाठीशी असल्याचं समोर आले आहे. ज्यातून पश्चिम बंगाल विधानसभेतील नंबर गेम अचानक बदलला आहे.

ममता यांच्यासोबत केवळ २१ आमदार?
माहितीनुसार, ५९ आमदारांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्याविरोधात बंड पुकारल्याने अधिकृतपणे ममता यांच्या नेतृत्वात केवळ २१ आमदार उरले आहेत. या आकडेवारीमुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस किती मोठ्या संकटात सापडली आहे याचा अंदाज येऊ शकतो. टीएमसीच्या बंडखोर गटातील आमदार मुस्तफिजुर रहमान यांनी ५९ आमदारांच्या पाठिंब्याबाबत दुजोरा दिला आहे. आम्ही सर्व ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नाही परंतु एखाद्या ज्येष्ठ नेत्याला विरोधी पक्षनेता बनवलं जावे अशी आमची मागणी आहे असं त्यांनी सांगितले.

ऋतब्रत बॅनर्जी यांना टीएमसीतील ८० पैकी ५९ आमदारांचा पाठिंबा आहे. ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांनी सोमवारी रात्री कोलकाता येथील आमदार निवासात अनेक आमदारांची भेट घेतली. त्याआधी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील बैठकीला ६० आमदारांनी गैरहजेरी लावली होती. ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात पक्षात एक गट तयार झाला आहे. पक्षातील या स्थितीला अनेक आमदारांनी अभिषेक बॅनर्जीला दोषी ठरवले आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारणे, घराणेशाही, भ्रष्टाचार यासारखे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. 

ऋतब्रत बॅनर्जींना विरोधी पक्षनेते बनवण्याचा डाव?
सत्तेतून पायउतार होताच टीएमसी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ज्यापद्धतीने पक्षात बंडखोरी वाढली आहे त्यातून पक्ष २ गटात विभागण्याची शक्यता आहे. टीएमसीतील बंडखोर गटाने ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते बनवण्याची मागणी केली आहे. हे बंडखोर आमदार विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांच्याकडे जाणार असून अध्यक्षांकडे ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र बंडखोर आमदार देऊ शकतात.