खुलताबाद, (प्रतिनिधी) ईद ए मिलादुन्नबीनिमित्त बुधवारी ऐतिहासिक हजरत ख्वाजा जैनोद्दीन शिराजी दर्गाहमध्ये पवित्र पैरहन मुबारक (पवित्र पोशाख) तसेच हजरत ख्वाजा शेख बुरहानोद्दीन गरीब रह. यांच्या दर्गाहमध्ये मुए मुबारक (पवित्र केस) यांच्या जियारतीसाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेले दर्शन बुधवारच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू होते.
खुलताबाद येथील दर्गाहमध्ये काचेच्या पेटीत सुरक्षित जतन करून ठेवण्यात आला आहे. बावीस ख्वाजा दर्गाहमध्ये पैरहन मुबारक, तर बाबा बुरहानोद्दीन यांच्या दर्गाहमध्ये मुए मुबारक जियारतीसाठी ठेवण्यात येते. बुधवारी (२६ ऑगस्ट) ईद-ए-मिलादुन्नबी साजरी होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली. रात्रीपासूनच जियारतीला सुरुवात
भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता दर्गाह कमिटीने मंगळवारी रात्री ९ वाजेपासूनच जियारतीस सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. बुधवारच्या मध्यरात्रीपर्यंत सलग जियारत सुरू ठेवण्यात आली.
-- भाविकांसाठी विशेष सुविधा --
लाखो भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुमारे १.५ किलोमीटरपर्यंत बॅरिकेटिंग केले होते. दर्गाह परिसरात आकर्षक रोषणाई व रंगरंगोटी करण्यात आली होती. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आले होते. तसेच दोन्ही दर्गाहमध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचे (लंगर) आयोजन करण्यात आले होते याशिवाय अनेकांकडून ठिकठिकाणी पोहे, चहा, बिस्किटे, पाणी, कोल्ड्रिंक आदी सुविधांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
-- जर जरी जर बक्ष उरुसाची सांगता --
खुलताबाद येथील हजरत शेख मुन्तजबोद्दीन उर्फ जर जरी जर बक्ष यांचा गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उरूसाची ईद-ए-मिलादुन्नबीच्या दिवशी सांगता झाली. पवित्र पोशाखाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी जर जरी जर बक्ष यांच्या दर्गाहमध्येही जियारत केली. उरूसात प्रसाद म्हणून खाजाची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली, तसेच विविध मनोरंजनाच्या साधनांचा भाविकांनी आनंद घेतला.
-- पोलिसांचा चोख बंदोबस्त --
लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव तसेच प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख चौक, दर्गाह परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
-- या मान्यवरांची उपस्थिती --
पवित्र पोशाखाच्या जियारतीसाठी सिल्लोडचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. हजरत सय्यद जैनोद्दीन दर्गाह कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्तार आणि चव्हाण यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी दर्गाह कमिटीचे अध्यक्ष शरफोद्दीन रमजानी, माजी नगराध्यक्ष तथा दरगाह कमिटी सदस्य अॅड. कैसरोद्दीन, सचिव मसियोद्दीन, मुनिबोद्दीन, वाजिद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक गजानन पाटील फुलारे, दिलीप बनकर पाटील, नगरसेवक अनिस जागीरदार, कैलास बारगळ, दिलीप बाविस्कर, नगरसेवक आयाज बेग, फैजान बेग, परवेज अहेमद, इकबाल अहेमद यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.













