गंगापूर तालुक्यात ट्रक चालकावर चाकू हल्ला; रात्री दोन घरफोड्या

Foto
पोलिसांनी घेतले दोन आरोपी ताब्यात 

गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर शहर व परिसरात गुन्हेगारी घटनांनी डोके वर काढले आहे. भरदुपारी ट्रक चालकावर चाकू हल्ला करून लूटमार, तर त्याच रात्री दोन घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजीनगरपुणे महामार्गावरील भेंडाळा फाटा परिसरात गुरुवारी (दि. २६) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास ट्रक चालकावर हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. ट्रकने (के. ए. ५६-१६४८) चालक देवेंद्र बागी (रा. हुमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक) हेण्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना भेंडाळा फाट्याजवळील ढाब्यावर ट्रक उभा करून विश्रांती घेत होते.

यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी ट्रकच्या केबिनमध्ये घुसून चालकाला मारहाण केली. चालकाने आरडाओरडा केल्यावर एका आरोपीने चाकूने कानावर वार करत जखमी केले. चालकाच्या खिशातील सुमारे ७ हजार रुपये हिसकावून ट्रकची समोरील काच फोडत आरोपी फरार झाले. जखमी अवस्थेत चालकाने ढोरेगावकडे धाव घेत मदत मागितली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

-- एका रात्रीत दोन घरफोड्या --
दरम्यान, २५ मार्चच्या रात्री शहरातील सखारामपंत नगर व संतोषी माता गल्ली परिसरात चोरट्यांनी दोन बंद घरांना लक्ष्य केले. संतोषी माता गल्ली येथील कदिर खान नसीर खान पठाण यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच २० हजार रुपये रोख असा एकूण ८८,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. विशेष म्हणजे घराचे मूळ खरेदीखतही चोरीला गेल्याची माहिती आहे.
तसेच सखारामपंत नगर येथील बाळू दामोदर कासोदे यांच्या बंद घरातून टीव्ही, गॅस टाकी व रोख रक्कम असा सुमारे ९,१०० रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला.

-- दोन आरोपी ताब्यात --
या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी अक्षय त्रिभुवन (वय २८) व सावन खाजेकर (वय २२, दोघेही रा. सखारामपंत नगर) यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. एकाच दिवशी लूटमार व घरफोड्यांच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.