छत्रपतींच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी विशेष कर वसुली मोहीम राबवणार, महापौरांची घोषणा

Foto

औरंगाबाद – क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी निधी कमी पडत असेल तर मालमत्ता कर वसुलीची विशेष मोहिम राबवण्याची घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली आहे. पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी १ कोटी ८४ लाख रुपये खर्च आपेक्षित आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीच या कामाची घोषणा करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दोन महिन्यांवर आल्यानंतर पालिकेला पुन्हा या कामाची आठवण झाली आहे.

राजू शिंदेंनी उपस्थित केला सवाल

महानगर पालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम पुन्हा एकदा सुरु करण्याची घोषणा महापौर घोडेले यांनी केली. क्रांतीचौकातील उड्डाणपुलापेक्षा  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी आहे. या पुतळ्याची उंची वाढवण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र अद्याप काम सुरु झालेले नाही. दोन महिन्यांवर शिवजयंती आली आहे, काम केव्हा सुरु करणार, असा सवाल भाजप नगरसेवक राजू शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर महापौरांनी काम लवकरच सुरु केले जाईल असे आश्वासन देत,  निधीची कमतरता भासली तर महापालिका  विशेष कर वसुली मोहिम राबवण्यास तयार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामासाठी साधारण एक कोटी ८४ लाख रुपये खर्च आपेक्षित आहे.