कृष्णा आंधळे आत्तापर्यंत तीनवेळा गावी येऊन गेला; सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांचा खळबळजनक दावा

Foto
बीड  : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलाय. कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती त्यांनी सीआयडीला देखील दिल्याचं सांगितले. कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नाही, मात्र त्याला जेलबंद कसे करायचे याचा विचार गरजेचा आहे. आमच्या कुटुंबाला या आरोपी पासून धोका आहे. हे आरोपी शैतानी वृत्तीचे असून कृष्णा आंधळेला अटक करून त्याची दिंड जिल्हाभरात काढावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी पार पडली. याच सुनावणी वेळी धनंजय देशमुख यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिलीय.

दरम्यान, सुप्रीम कोर्टात येत्या 26 तारखेला वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. याबाबत कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. आमचे म्हणणे आम्ही न्यायालयात देणार असल्याचं देशमुख यांनी यावेळी म्हटलं. मागील दीड वर्षांपासून देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचेही ते म्हणाले.

पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार, सुनावणीत आज नेमकं काय घडलं?

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे. आजच्या (21 फेब्रुवारी) सुनावणीत आरोपी पक्षाला सर्व कागदपत्राची पूर्तता करा, अशा सूचना कोर्टाच्या वतीने सरकारी पक्षाला देण्यात आल्या आहेत. आरोपी क्रमांक तीन ते सात यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम बदलण्यात यावे यासाठी केलेल्या अर्जावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणे सादर केले जाणार असल्याची माहिती आहे. तसेच विष्णू चाटेच्या जेल बदलीच्या अर्जावर आज ऑर्डर येण्याची शक्यता आहे. तर आरोपी जयराम चाटेकडून वकील बदलला आहे. नवीन वकील एम के वाघीरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे.

सरकारी पक्षाकडून एवढी घाई का?

दरम्यान, कोर्टाकडून प्रतीक घुलेला विचारणा करण्यात आली कि, वकील लावायचा आहे का? यावर प्रतीक घुलेकडून उत्तर देण्यात आलं आणिपुढील दहा ते पंधरा दिवसात घरचे लोक वकील बघतील असं सांगण्यात आलंय. लॅपटॉपची क्लोन कॉफी मिळाली नाही, फॉरेन्सिकचा रिपोर्टही मिळाला नाही, पेन ड्राईव्ह मिळाला नाही. या सर्व गोष्टीची पूर्तता झाल्याशिवाय साक्षीदारांची लिस्ट स्वीकारू नये. असे म्हणत आरोपींच्या वकिलांची कोर्टाकडे विनंती केली आहे. तर सरकारी पक्षाकडून एवढी घाई का केली जात आहे. सरकारी पक्षाला दोषारोप पत्र एकदाच पूर्ण दाखल करायला सांगा. असे म्हणत आरोपी वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी मागणी केली आहे.