महेश नवमीचा उत्साह : भक्तिरसात न्हाऊन निघाले भक्तगण
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
महेश नवमीच्या पावन पर्वानिमित्त शहरात भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. जिल्हा माहेश्वरी युवा संघटना आणि सिडको-हडको महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू दर्शन : एक भक्तिमय संध्या या संगीतमय भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शहरातील अनेक मान्यवर नागरिक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण इंदूर येथून आलेले सुप्रसिद्ध भजन गायक कुबेर माहेश्वरी होते. त्यांनी आपल्या मधुर आवाजात भावपूर्ण भजनांनी भक्तिमय मैफल रंगवली. उपस्थित भाविक मंत्रमुग्ध होऊन भक्तीच्या रंगात तल्लीन झाले. या भक्तिरसपूर्ण वातावरणाला अधिक सजीव करण्यासाठी युवा संघटना आणि सिडको-हडको महिला मंडळाच्या सदस्यांनी भगवानांच्या विविध आकर्षक आणि मनमोहक देखावे सादर केले. या सजीव देखाव्यांनी उपस्थितांची मन जिंकले. हा सोहळा यशस्वी
करण्यासाठी जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष वैभव मंडोरा, सचिव श्रीनिवास लखोटिया आणि कोषाध्यक्ष अमित मानधने तसेच सिडको हडको महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रीती झंवर, सचिव अनिता सोनी आणि कोषाध्यक्षा मधु करवा यांचे योगदान लाभले. तसेच प्रकल्प प्रमुख सीए रामकुमार राठी, सीए गौरव भट्टड, सीए आशीष सोमाणी, निहार बलदवा, अनिल चांडक, मधु करवा आणि नेहा भंडारी यांनीही सहकार्य केले. दोन्ही संस्थांच्या कार्यकारिणी सदस्यांनी
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष सुनील मालानी, सचिव अनिल बाहेती तसेच सर्व संलग्न संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांनी या सुबक, शिस्तबद्ध आणि आयोजनाचे मनापासून कौतुक केले. महेश नवमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली ही प्रभू दर्शन भजन संध्या समाजातील सर्वांसाठी अविस्मरणीय आणि आध्यात्मिक आनंद देणारी ठरली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













