८०० कोटींच्या थकबाकीसाठी ६ हजार जणांची महापालिकेकडून लिस्ट तयार
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे 'अॅक्शन मोड'मध्ये आले आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या तब्बल ६ हजार बड्या मालमत्ताधारकांची विशेष हिटलिस्ट महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने तयार केली आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या थकबाकीदारांविरुद्ध धडक वसुली मोहीम हाती घेण्यात आली असून, कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांच्या मालमत्ता थेट सील करण्याचा बडगा उभारण्यात आला आहे.
सध्या महापालिकेच्या दप्तरी ३ लाख ४२ हजार मालमत्तांची नोंद आहे. यातील जुन्या व नव्या अनेक निवासी आणि व्यावसायिक मालमत्ताधारकांकडे कोट्यवधी रुपयांचा कर
थकलेला आहे. परिणामी एकूण थकबाकीचा आकडा ८०० कोटी रुपयांच्या पार गेला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, दर आठवड्याला विभागाचा आढावा घेतला जात आहे. आयुक्त येडगे यांच्या सूचनेनुसार झोननिहाय थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. १ लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ६ हजार मालमत्ताधारकांचा शोध घेऊन त्यांच्यावर आता लक्ष केंद्रित केले जात आहे. अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपायुक्त विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली १४१ कर्मचाऱ्यांचे पथक या वसुलीसाठी मैदानात उतरले आहे. 'एसआयआर'च्या कामामुळे काही काळ मंदावलेल्या या मोहिमेला आता पुन्हा वेग देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
सक्तीची वसुली सुरू : उपायुक्त
मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. १ लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांची यादी तयार करून सक्तीची वसुली सुरू केली आहे. वारंवार सूचना देऊनही थकीत कराचा भरणा न करणाऱ्यांच्या मालमत्ता तत्काळ सील करण्यात येत आहेत, उपायुक्त विकास नवाळे यांनी सांगितले.
थकबाकी ८९९ कोटींवर
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत ७६ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. यंदा महापालिकेने २५० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले असून, ते गाठण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ११ कोटी रुपयांची पाणीपट्टीही वसूल करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांचा कर थकलेला आहे. परिणामी, एकूण थकबाकीचा आकडा ८९९ कोटी रुपयांच्या पार गेला आहे.
https:lepaper.sanjwarta.in Powered By: Vrudhee Sclutions














