छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील
विष्णुनगर भागात २० वर्षांपूर्वी झालेले जुने भांडण उकरून काढत एका मजुराला कैचीने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र विठ्ठल कातार (वय ४८, रा. विष्णुनगर, गल्ली नं. ७) असे जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास विष्णुनगरमधील बंडू मामा
चौकाजवळ ही घटना घडली.
फिर्यादी रवींद्र कातार हे आपल्या घराच्या परिसरात असताना, त्याच गल्लीत राहणारा आरोपी मनोज वाणी याने त्यांच्याशी जुन्या वादावरून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपीने कातार यांना मारहाण करून शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने हातात कैची घेऊन कातार यांच्या डाव्या मनगटावर वार केला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
पतीला मारहाण होत असल्याचे पाहून त्यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी धावून आली. मात्र, आरोपी मनोज वाणी याने तिलाही ए भवानी, तू
इथे कशाला आली? असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली आणि दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादी यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलीस उपनिरीक्षक सुतार यांनी याप्रकरणी आरोपी मनोज वाणीविरुद्ध भा.न्या.सं.चे कलम आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार देगलूर (बकल नं. २६६) या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा ई-साक्ष पंचनामा केला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions