दोन तरुणांविरुद्ध पोक्सोसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच ती गर्भवती राहिल्याचा गंभीर प्रकार छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील फेरण जळगाव परिसरात समोर आला आहे.
याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात दोन तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण संजय गायके, रामेश्वर आप्पा शेळके, दोघे रा. फेरण जळगाव, ता. छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित मुलगी १५ वर्षांची आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत आरोपींनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडितेने आरोपीकडे लग्नासाठी तकादा लावला असता आरोपींनी तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गालगत बटाईने केलेल्या शेतात तसेच आरोपींपैकी एकाच्या घरी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपी किरण गायके, रामेश्वर शेळके यांच्याविरुध्द करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत करीत आहेत.













