सांजवार्ता ऑनलाईन May 26, 2019
रांची : लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. लालूप्रसाद यांच्या आरजेडीला खातेही उघडता आले नाही. याच तणावातून लालूप्रसाद यांनी अन्नत्याग केल्याचे सांगण्यात येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधील एकूण 40 जागांपैकी 39 जागांवर भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार निवडून आले आहेत.
लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यांची मुलगी मिसा भारती यांचा दारूण पराभव झाला. या पराभवामुळे लालूप्रसाद फारच व्यथित झाले असून, त्यांची दैनंदिनी पूर्णपणे बदलली आहे. रांची येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते सकाळी पोटभर नाश्ताही करत नाहीत. दुपारी जेवत नाहीत. सकाळी नाश्ता केल्यानंतर थेट रात्रीच जेवतात. त्यामुळे त्यांना इन्सुलिन देणेही कठीण झाले आहे. लालूप्रसाद यांची आमच्या परीने समजूत काढण्यात येत आहे. दुपारी जेवण न करणे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. वेळेवर जेवण केले नाही तर त्यांना औषधी आणि इन्सुलिन देणे कठीण होणार आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.