औरंगाबाद : भाऊ वाटण्यात आलेल्या शेतातील रस्त्यावरून जाण्यावरून दोन भावंडात वाद झाला. हाणामारी होऊन तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गंगापुर तालुक्यातील शहापूर येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेखनाथरावजी मुंजाहरी राऊत, मुंजा हरी राऊत व रमेश राऊत असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. शेकनाथरावजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, बाळू रावजी राऊत, रामेश्वर संजय राऊत, रावजी गोविंद राऊत व अन्य एक जण सर्व राहणार शहापूर यांच्याविरुद्ध शिलेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, रावजी व शेखनाथराव हे दोघे चुलत भाऊ आहेत. भाव वाटण्यात त्यांच्या शेजारी शेजारी जमीन आलेली आहे. बुधवारी शेखनाथराव त्यांच्या शेतातील रस्त्याने जात होते. त्यावेळी रावजी सोबत त्यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रावजी यांच्या गटाने शेखनाथराव यांचे वडील मुंजाहरी व भाऊ रमेश यांना लाट्या काट्यांनी मारहाण केली. यात तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी हे करीत आहे.