मराठवाड्यात नेत्यांचे दौरे अन पंचनाम्याचे कागद कोरे !! विभागीय आयुक्त संतप्त, अधिकाऱ्यांना धरले धारेवर....

Foto
सतीश जोशी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यावर जणू आभाळ कोसळले आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यात विभागातील तब्बल 1 हजार 745 गावे सापडली असून 86 जणांना जीव गमवावा लागला तर जवळपास पावणे दोन हजार जनावरे दगावली आहेत. या भयंकर संकटाने शेतकरी उद्ध्वस्त झाला. आता अख्ये मंत्रिमंडळच मराठवाड्याचे दौरे करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर तर उपमुख्यमंत्री अजित पवार बीड, धाराशिव तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव आदी जिल्ह्यांचा दौरा केला. मंत्री दौरे करीत असले तरी प्रशासन मात्र ढिम्मच आहे. शेतकरी मदतीसाठी ओरड करीत असताना छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड लातूर या जिल्ह्यांनी पंचनामेच केले नाहीत. त्यामुळे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर संतप्त झाले. गुरूवारी त्यांनी संताप व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले.

मराठवाड्यावरील संकटाचे सत्र काही केल्या कमी होत नाही. शेतकरी आत्महत्यांचा विभाग असलेल्या या विभागात यंदा अतिवृष्टीने हाहाकार माजवला. वार्षिक सरासरीच्या दीडपट पाऊस या विभागात झाला आहे. या अतिवृष्टीच्या तडाख्यात मराठवाड्यातील 1 हजार 745 गावे उद्ध्वस्त झाली आहेत. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक 569 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. हिंगोली 224, जालना 217, लातूर ्र208, छत्रपती संभाजीनगर 161, बीड 160, धाराशिव 116 तर परभणी जिल्ह्यातील 70 गावे बाधित झाली आहेत. तर 86 जणांना प्राण गमवावे लागले. पुर आणि वीज कोसळून 1 हजार 725 जनावरे दगावली आहेत. त्याचबरोबर जवळपास 5 हजार 277 घरांची पडझड झाली आहे. या अतिवृष्टीने मराठवाड्यातील 23 लाख 96 हजार 162 हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत.

अतिवृष्टी पाहणीच्या लाटा...अन पंचनाम्यावर वरवंटा...


मराठवाड्यात पिके पाण्याखाली गेली, नद्यांच्या पुराने शेती खरवडून गेली. सगळीकडे हाहाकार उडाला असताना मंत्री अन राजकीय नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांच्या लाटाच आल्या आहेत. मुख्यमंत्र्यासह इतर मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्याचे दौरे होत आहे. या दौऱ्यामुळे प्रशासनाचीही मोठी अडचण होत असून दौऱ्याचा फटका प्रशासकीय कामकाजावर होत असल्याचे दिसते. अनेक जिल्ह्यांनी नुकसानीचे पंचनामेच पूर्ण केले नाहीत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 287 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला. मात्र अद्याप फक्त 0.22 टक्केच पंचनामे पूर्ण झाले आहेत. जालना जिल्ह्यात 60 हजार 167 हेक्टरवर नुकसान झाले प्रशासनाने आतापर्यंत केवळ 23 टक्केच पंचनामे पूर्ण केले. बीड जिल्ह्यात 4 लाख 46 हजार 170 हेक्टर शेतीचे नुकसान झाले पंचनामे मात्र अवघे 42 टक्केच झाले आहेत. लातूर जिल्ह्यात 4 लाख 3 हजार 438 हेक्टरला फटका बसला 75 टक्केच पंचनामे पूर्ण झाले आहेत. धाराशिव 81 टक्के, परभणी 94 हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांनी पंचनाम्यांचे काम 100 टक्के पूर्ण केले.

आयुक्तांनी टोचले कान...


सचिवांनी नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर पंचनाम्याची स्थिती विचारली. तेव्हा विभागीय आयुक्तांकडे उत्तरच नव्हते. त्यानंतर मात्र विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत पापळकर प्रचंड संतप्त झाले होते. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच पंचनाम्याचे काम सर्वात कमी असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.