विधी सेवा महाशिबिर, शासकीय सेवा योजनांचा महामेळावा उत्साहात

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती व गंगापूर तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबीर तसेच शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सन्माननीय न्यायमूर्ती अभय एस. वाघवसे यांच्या शुभहस्ते झाले.

अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गिरीश आर. अग्रवाल हे होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश आर. डी. पाटील, तालुका विधी सेवा समिती गंगापूरचे अध्यक्ष एस. बी. बहाळकर, गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शनिवारी (दि. १४) रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा न्यायालय परिसर, गंगापूर येथे झाला. कार्यक्रमाच्या निमंत्रक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, औरंगाबाद यांच्या सचिव वैशाली प्र. फडणीस होत्या. गंगापूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष के. आर. क-हाळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

 कार्यक्रमस्थळी प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताच धूत कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी सुमधुर संगीताच्या माध्यमातून पारंपरिक व उत्साहपूर्ण स्वागत केले.
या महाशिबिरात नागरिकांना विधी सल्ला, शासकीय योजना, विविध सेवा व न्यायसहाय्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वकील व नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने कार्यक्रम यशस्वी ठरला. 

महामेळाव्यात गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप, रक्तदान शिबिर, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, तालुका कृषी कार्यालय, गंगापूर उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या स्वतंत्र स्टॉल्सद्वारे नागरिकांना थेट सेवा पुरविण्यात आल्या. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून तत्काळ मार्गदर्शन व आवश्यक सेवा दिल्यामुळे हा महामेळावा उपयुक्त ठरला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.