लेथपोरा हल्ल्याचा मास्टरमाइंड निसार अहमद भारताच्या ताब्यात

Foto
नवी दिल्‍ली:  जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड निसार अहमद तांत्रे याला संयुक्‍त अरब अमीरातने (यूएई) भारताच्या ताब्यात दिले आहे. निसार तांत्रे हा पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’या दहशतवादी संघटनेचा   दहशतवादी आहे.  

निसार तांत्रे हा ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेच्या दक्षिण काश्मीरचा विभागीय कमांडर नूर तांत्रे याचा भाऊ आहे. निसारला विशेष विमानाने दिल्‍लीत आणण्यात आले व त्यानंतर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआय) ताब्यात देण्यात आले. एनआयए न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी निसारविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. याच आधारे त्याला यूएईकडून भारतात आणले गेले. नूर तांत्रे यानेच जैश-ए-मोहम्मद या संघटनेला काश्मीर खोर्‍यात जम बसवायला मदत केली, असे मानले जाते. नूरला डिसेंबर २०१७ मध्ये ठार करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून यूएईने फरारांना भारताच्या ताब्यात द्यायला सुरू केले आहे. यात काही दहशतवाद्यांचाही समावेश आहे. यूएईने आतापर्यंत ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात लाच खाण्याचा आरोप असलेला आरोपी ख्रिश्‍चियन मिशेल, या प्रकरणातील कथित दलाल दीपक तलवार यांच्या व्यतिरिक्‍त दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचे समर्थक, इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल वाहिद सिद्दिबापा व १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी फारूख टकलासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात दिले आहे. निसार तांत्रे याच वर्षी भारतातून यूएईला पळून गेल्याचे सांगितले जात आहे