फुलंब्री, (प्रतिनिधी) तालुक्यातील वारेगाव येथे उसाच्या फडात बिबट्याची दोन पिल्ले आढळून आल्याने परिसरात शुक्रवारी मोठी खळबळ उडाली. ऊसतोडणी सुरू असताना ही घटना उघडकीस आली, ग्रामस्थांसह ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वारेगाव येथील शेतकरी प्रदीप तेजराव जाधव यांच्या शेतात ऊसतोडणीचे काम सुरू होते. मजूर ऊस तोडत असताना अचानक उसामधून हालचाल झाल्याने त्यांनी पाहणी केली असता एक बिबट्याचे पिल्लू दिसून आले. त्यामुळे काही काळासाठी कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पुन्हा त्याच परिसरात आणखी एक पिल्लू आढळल्याने भीती आणखीनच वाढली. घटनेची माहिती मिळताच सरपंच रत्नप्रभा संदीप बोरसे, सागर ठेंगे, प्रदीप जाधव यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला.
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करत उसाच्या फडात शोधमोहीम सुरू केली. मादी बिबट्या आसपास असण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने विशेष खबरदारी घेतली. दिवसभर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून होते. ग्रामस्थांना सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे, लहान मुलांना एकटे सोडू नये, आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले.
सायंकाळच्या सुमारास एक पिल्लू अचानक उसाच्या फडात पळून गेल्याची माहिती समोर आली. दुसरे पिल्लू सुरक्षित राहावे, यासाठी त्याला त्याच ठिकाणी कॅरेट खाली झाकून ठेवले आहे. मादी बिबट्या रात्रीच्या वेळी परत येऊन पिल्लाला घेऊन जाईल, अशी शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. परिसरात वनविभागाचे लक्ष कायम ठेवले आहे. कालपासून पिल्लाच्या आईचा शोध सुरू आहे. परंतु आईचा शोध लागलेला नाही. या पिल्लाच्या शोधासाठी त्याची आई येऊ शकते यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे.













