खुलताबाद, (प्रतिनिधी) : तालुक्यातील गल्ले बोरगाव शिवारात सोलापूरधुळे महामार्गावर खोकरीनदी पुलाजवळ अज्ञात वाहनाची धडक लागून एक नर बिबट्या मरण पावल्याची घटना घडली आहे. या विषयी शेतकरी दिलीप बेडवाल यांनी वन विभागाला माहिती देताच तत्काळ वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
ही घटना कृषी विभागाचे बीज गुण केंद्र गट क्रमांक १६ च्या हद्दीत शुक्रवारी रात्रीचे सुमारास घडली, घटनेचा सविस्तर पंचनामा करण्यात आला. तसेच या घटनेची माहिती पशुसंवर्धन विभाग, खुलताबाद यांना देण्यात आली. पशुधन विकास अधिकारी डॉ. उत्कर्ष वानखेडे, डॉ. दोडके तसेच सहकारी नागे यांनी घटनास्थळी येऊन मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर बिबट्याचे दहन करण्यात आले.
या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई उपवनसंरक्षक, छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक सुवर्णा माने, सहायक वनसंरक्षक, छत्रपती संभाजीनगर आशा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबाद वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख, वनपाल एस. आर. मोरे, वनरक्षक मयूर चौधरी, पुरुषोत्तम, बबन सोनवणे, बबन मसूर, नाना आवटे यांनी केली.












