दाणे वस्तीत विहिरीत बिबट्या; वन विभागाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याला केले जेरबंद

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी): तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या बिबट्याच्या दहशतीने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. शुक्रवारी सकाळी वैजापूर येथील दाणे वस्ती परिसरात एका बिबट्याने थेट शेतकऱ्याच्या विहिरीत उडी घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

दाणे वस्ती येथील गट क्रमांक ४७४ मध्ये असलेल्या गणेश मलिक यांच्या विहिरीत हा बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, स्थानिक तरुणांचे प्रसंगावधान आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे या बिबट्याला सुरक्षितरीत्या बाहेर काढून जेरबंद करण्यात आले आहे. सुदैवाने, या संपूर्ण धरारात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतकरी गणेश मलिक हे शेतात काम करण्यासाठी गेले होते. पिकांना पाणी देण्यासाठी शेतपंप सुरू करण्याच्या उद्देशाने ते विहिरीकडे वळले. विहिरीजवळ पोहोचताच त्यांना आतून काहीतरी हालचाल होत असल्याचे आणि पाण्याचा आवाज येत असल्याचे जाणवले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, समोरचे दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. विहिरीच्या काठाला धरून एक मोठा बिबट्या बाहेर निघण्यासाठी धडपड करत होता.

 ही माहिती वाऱ्यासारखी वैजापूर तालुक्यातील हा परिसर डोंगराळ आणि शेतीचा असल्याने इथे वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच असतो. मात्र, बिबट्या थेट वस्तीजवळ असलेल्या विहिरीत पडल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वनविभागाने अशा संवेदनशील भागात गस्त वाढवावी. आणि विहिरींना संरक्षक जाळ्या बसवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनबद्दल वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे आणि दाणे वस्तीवरील सतर्क तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दाणे वस्ती परिसरात पसरली. आणि काही वेळातच बध्यांची मोठी गर्दी त्या ठिकाणी जमली.
बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच परिसरातील अरविंद दाणे, श्रीराम दाणे, ताराचंद दाणे, सतीश अंभोरे, दत्तू दाने, अजय मलिक, सागर आंबोरे, भगवान दाणे, सागर राजपूत आणि कचरू वाणी यांसारख्या धाडसी तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या पाण्यात जास्त वेळ राहिल्यास थकून बुडण्याची भीती होती. त्यामुळे वनविभागाची वाट न पाहता या तरुणांनी माणुसकीच्या नात्याने आणि धाडस दाखवत विहिरीत एक मोठी बाज (खाट) सोडली. बिबट्यानेही जीव वाचवण्यासाठी त्या बाजेचा आधार घेतला. आणि तो त्यावर विसावला. या प्राथमिक मदतीमुळे बिबट्याला जीवदान मिळाले.

घटनेचे गांभीर्य ओळखून दत्ता गायकवाड यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक रेस्क्यू साहित्यासह
घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत बिबट्याला पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ज्यामुळे बिबट्या अधिकच बिथरला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम गर्दीवर नियंत्रण मिळवले आणि त्यानंतर पद्धतशीरपणे रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला त्यात जेरबंद करण्याचे नियोजन करण्यात आले.

अनेक तासाच्या धरारानंतर आणि अत्यंत कौशल्याने राबवलेल्या मोहिमेनंतर बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त होताच ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले की, हा बिबट्या शिकारीच्या नादात किंवा अंधारात रस्ता चुकल्यामुळे विहिरीत पडला असावा. त्याला आता तपासणीसाठी वनविभागाच्या सुरक्षित केंद्रामध्ये नेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल.