उसाच्या फडातील झाडावर दिसला वन्यजीव; फोटो व्हायरल, वनविभागाचे पाहणीचे आश्वासन
सिल्लोड, (प्रतिनिधी): तालुक्यातील पालोद येथील खेळणा (माणिक सागर) मध्यम प्रकल्प परिसरातील पालोद शिवारात गेल्या तीन ते चार दिवसांपासून एका हिंस्त्र वन्यप्राण्याचे दर्शन घडत असल्याने शेतकरी वर्गात मोठी धास्ती पसरली आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास या भागात वन्यप्राण्याचा वावर असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.
बुधवारी (दि. ६) सायंकाळी एका संबंधित शेतकऱ्याने उसाच्या शेतातील एका झाडावर बसलेल्या या प्राण्याचे छायाचित्र आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, वनविभागाने या प्रकरणाची दखल घेत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या मते बिबट्याच...
कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्राणी नेमका बिबट्या आहे की अन्य कोणताही मार्जार कुळातील हिंस्त्र वन्यजीव, याबाबत सध्या परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, ज्या प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी या प्राण्याला डोळ्यांनी पाहिले आहे, त्यांनी हा प्राणी बिबट्याच असल्याचा दावा केला आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे वनक्षेत्रातील नैसर्गिक जलस्त्रोत आटल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्ती व शिवारातील जलस्त्रोतांकडे सरकत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पालोद शिवारात उसाचे क्षेत्र मोठे असून, दाट झाडीमुळे वन्यजीवांना लपण्यासाठी सुरक्षित आश्रय मिळत आहे.
या संदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असल्याचे सांगितले. वनविभागाचे पथक लवकरच प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करणार असून पगमार्क (पाऊलखुणा) व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सदर प्राण्याची अधिकृत ओळख पटवली जाईल. तोपर्यंत कॅमेऱ्यात दिसणारा प्राणी बिबट्याच आहे की अन्य वन्यजीव, हे तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट होणे बाकी आहे.
वनविभागाची अधिकृत पाहणी पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांनी शेतात जाताना खबरदारी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. वनविभागाने केवळ माहिती न घेता प्रत्यक्ष गस्त वाढवावी आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालोद येथील ग्रामस्थांनी केली आहे.












