शेजारधर्म पाळूया, ब्रिक्स परिषदेपूर्वी चीनचा भारताला मोठा संदेश; मोदी-जिनपिंग भेटीवर जगाचे लक्ष

Foto
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आज नवी दिल्ली येथे होणार्‍या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि बहुप्रतीक्षित द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी बीजिंगने उत्तम शेजारधर्माचा संदेश देत, दोन्ही आशियाई महासत्तांनी त्यांच्या दीर्घकालीन मैत्रीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि मतभेद योग्य प्रकारे हाताळले पाहिजेत यावर भर दिला आहे.

२०२० मधील गलवान संघर्ष आणि अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यानंतर दोन्ही देशांकडून राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच, तब्बल सात वर्षांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पहिल्यांदाच भारतात येत आहेत. या बैठकीवर भाष्य करताना भारतातील चीनचे राजदूत शू फेईहॉन्ग यांनी सांगितलं की, दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये धोरणात्मक सुधारणा करण्यासाठी बीजिंग नवी दिल्लीसोबत एकत्र काम करेल.

शू यांनी ट्विट केलं की, दोन्ही नेत्यांच्या धोरणात्मक मार्गदर्शनानुसार काम करण्यासाठी चीन भारतासोबत सहकार्य करेल. धोरणात्मक उंचीवरून आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून द्विपक्षीय संबंध हाताळणे, संवाद वाढवणे, सहकार्य दृढ करणे, मतभेद योग्य प्रकारे सोडवणे आणि एकमेकांना यशस्वी होण्यासाठी मदत करणारे उत्तम शेजारी व भागीदार बनणे, यासाठी चीन कटिबद्ध आहे.

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातील ही द्विपक्षीय बैठक या दोन्ही नेत्यांच्या सलग तिसर्‍या वर्षातील भेटीची साक्ष असेल; यापूर्वी ते कझान आणि टियांजिन येथे भेटले होते. चीनी राष्ट्राध्यक्ष आज दुपारी साधारण १ वाजता नवी दिल्लीत उतरणार असून, सायंकाळी ५.४५ वाजता पंतप्रधान मोदींसोबत आणि त्यांची शेवटची भारत भेट २०१९ मध्ये चेन्नईजवळील महाबलीपुरम (मामल्लापुरम) येथे पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी झाली होती.त्यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे.

चीनचा संवाद आणि सहकार्यावर भर
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनीही राजदूत जू यांच्या सुरात सूर मिसळत उत्तम शेजारधर्मावर भर दिला. माओ यांनी सांगितलं की, इराण-अमेरिका संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, संवादाच्या आणि वाटाघाटींच्या माध्यमातून वाद सोडवण्यासाठी आणि शांतता व स्थिरतेमध्ये योगदान देण्यासाठी चीन ब्रिक्स देशांसोबत काम करण्यास तयार आहे. ब्रिक्स ही संघटना उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांसाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून पुढे आली असून, ती ग्लोबल साउथच्या आघाडीवर उभी असलेली एक खरी शक्ती बनली असल्याचं त्यांनी नमूद केलं.

भारत सध्या ब्रिक्सचा अध्यक्ष असून १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद भूषवत आहे. शी जिनपिंग यांनी पहिली भारत भेट सप्टेंबर २०१४ मध्ये केली होती. त्यानंतर २०१६ मध्ये गोव्यात झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेला ते उपस्थित राहिले होते