आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटीची भरपाई द्या, शिक्षणमंत्र्यांची हकालपट्टी करा... कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दीपकेंचे पीएम मोदींना पत्र

Foto
मुंबई : देशभरात गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणावरून तरुणांमधील असंतोष आता आणखी तीव्र झाला आहे. २० जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर विद्यार्थ्यांच्या प्रस्तावित मोठ्या आंदोलनापूर्वी, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सविस्तर पत्र लिहून थेट हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीची मागणीचा पुनरुच्चार केला असून, पेपर लीकच्या तणावामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत देण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात अभिजीत दीपके यांनी अत्यंत भावनिक आणि गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, मी आज अत्यंत जड अंतःकरणाने तुम्हाला पत्र लिहीत आहे. आपल्या देशाचे भविष्य असलेल्या युवा विद्यार्थ्यांचे जीवन आणि मानसिक आरोग्य सध्या एका मोठ्या संकटामुळे धोक्यात आले आहे.गेल्या काही आठवड्यांत पेपर लीक आणि परीक्षांमधील अनिश्चिततेमुळे ११ विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले आहे, ज्यापैकी ५ आत्महत्या तर गेल्या ४८ तासांत झाल्या आहेत. पुन्हा परीक्षा द्यावी लागणार की नाही, या अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांमधील मानसिक ताण कमालीचा वाढला आहे.

अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बँकांकडून मोठी शैक्षणिक कर्जे घेतली होती. काहींनी आपल्या आयुष्याची संपूर्ण पुंजी मुलांच्या अभ्यासावर खर्च केली. अशा परिस्थितीत मुलांचा मृत्यू झाल्याने हे सर्व कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या सर्व प्रभावित कुटुंबांना तातडीने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी दीपके यांनी केली आहे.

शिक्षणमंत्र्यांना हटवा, ही सरकारची कमजोरी नव्हे तर जबाबदारी असेल!
अभिजीत दीपके यांनी पत्रात म्हटले आहे की, कॉकरोच जनता पार्टी गेल्या महिनाभरापासून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभरात आंदोलने करत आहे. शिक्षण व्यवस्थेवरील लाखो विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास पुनरुस्थापित करण्यासाठी नेतृत्वाला जबाबदार धरणे आवश्यक आहे. कारवाई न केल्यास प्रशासन सध्याच्या भ्रष्ट स्थितीला स्वीकारत असल्याचा चुकीचा संदेश जाईल. शिक्षणमंत्र्यांना पदावरून हटवल्यास सरकार कमकुवत दिसणार नाही, उलट उत्तरदायित्वाप्रती सरकारची कटिबद्धता दिसून येईल आणि सरकारची प्रतिमा सुधारेल, असा युक्तिवाद त्यांनी पत्रात केला आहे.

२० जूनला जंतर-मंतरवर जमणार...
यापूर्वी ६ जून रोजी अभिजीत दीपके यांच्या आवाहनावर शेकडो विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिक दिल्लीत एकत्र आले होते. त्यानंतर या संघटनेने विविध शहरांमध्ये मोहीम राबवून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आता २० जून रोजी देशभरातून विद्यार्थी जंतर-मंतरवर आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकत्र येत असून, सरकार भारताच्या भविष्याचा आवाज नक्कीच ऐकेल, अशी आशा त्यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केली आहे.